घरमुंबईमानसिक आजारांमध्ये मुंबई शहर अव्वल स्थानी

मानसिक आजारांमध्ये मुंबई शहर अव्वल स्थानी

Subscribe

मानसिक आजारांसाठी मुंबई शहर अव्वल असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्रासह मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज असल्याचे दिसून आले.

भारतात मानसिक आजाराच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असून २०३० पर्यंत जवळपास तीस टक्के भारतीयांना मानसिक आजाराचा त्रास होईल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. दोन वर्षांपूर्वी भायखळा येथील शासनाच्या जे.जे. रुग्णालयातील तज्ज्ञांच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात महाराष्ट्रासह मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज असल्याचे दिसून आले. विविध प्रकारच्या मानसिक आजारांमध्ये महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून महाराष्ट्रात मुंबईचा क्रमांक पहिला लागतो.

मानसिक आजारांसाठी डॉक्टरकडे जाण्याचे प्रमाण वाढले

आज सोशल मीडिया तसेच डीजीटल क्रांतीमुळे मानसिक आरोग्य हा विषय घराघरांमध्ये तसेच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये चर्चेला येत असून याचा फायदा भविष्यामध्ये नक्की होईल असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे मनोविकार तज्ञ डॉ. ओंकार माटे सांगतात, ” गेल्या काही वर्षांत मानसिक आजारासाठी डॉक्टरांकडे जाण्याच्या प्रमाणात हळूहळू वाढ होत आहे. मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणे याचा अर्थ डोकं फिरलं आहे किंवा वेड्याचे झटके येऊ लागले आहेत, हा गैरसमज बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. नोकरदार महिला तसेच वृद्धही आपल्या मानसिक प्रश्नांसाठी डॉक्टरांकडे जाणे पसंत करू लागले आहेत. शहरामध्ये एकत्रीत कुटुंब व्यवस्था कोलमडली असून मानसिक ताण आला तर तो व्यक्त करण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती जवळपास नसते आणि हाच ताणतणाव वाढून त्या व्यक्तीला मानसिक आजाराला सामोरे जावे लागते. सध्या समाजातल्या सर्वच स्तरात मानसिक ताण-तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. याला कारण म्हणजे बदलती जीवनशैली. रोजच्या आयुष्यातील दगदग, सततचे अपयश, नकार, विरह, खाजगी नोकरीतील टार्गेट्स,पैशांचे व्यवस्थापन ही कारणे मानसिक ताण तणाव वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. या वाढलेल्या मानसिक ताणतणावाचे नियंत्रण करणे फार गरजेचे झाले आहे ”

- Advertisement -

‘ही’ आहेत मानसिक आरोग्य बिघडण्याची लक्षणे

मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मनोचिकित्सक सल्लागार डॉ. सोनल आनंद म्हणाल्या ,”नैराश्याच्या आजाराचे योग्य निदान करता येते आणि योग्य औषधोपचाराने आजार बरा होऊ शकतो. औषधोपचार केला नाही तर वारंवार नैराश्याचा विचार होणे आणि रुग्ण स्वत:साठी किंवा इतरांसाठी धोकादायक होणे किंवा आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा वारंवार प्रयत्न करणे असे प्रकार घडू शकतात. नैराश्यावरील औषधांचा परिणाम दिसण्यास दोन, तीन आठवडे लागतात. त्यामुळे औषधे नियमितपणे घेणे व औषधांचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. औषधे काही महिने घ्यावी लागतात. त्यात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बदल करू नये किंवा बंद करू नये. स्वत:शी सतत बोलणे, सततची चिडचिड, घरातील व्यक्तींवर रागावणे अथवा दरवाजा बंद करून रडत राहणे, बाहेरील जगाशी संपर्क तोडणे ही मानसिक आरोग्य बिघडल्याची लक्षणे आहेत अशी माहिती डॉ सोनल आनंद यांनी दिली.

इंटरनेटमुळे मुलांच्या मनावर होतोय परिणाम

आठवीतील अमोल (बदललेले नाव) मोबाईल गेम्सच्या आहारी गेल्याने त्याच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं आहे. तर, कॉमर्सच्या शेवटच्या वर्षात शिकणारा रोहन युट्यूब वर अपलोडिंग करुन पैसे मिळतात म्हणून कॉलेजला बंक करणारा. या दोघांवरही इंटरनेटच्या आहारी गेल्याने राज्य सरकारच्या गोकुळदास तेजपाल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या दोघांवरही सध्या समुपदेशानाचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे जगभरातील मुलं हे इंटरनेटच्या आहारी गेले असल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे. ही मुलं गॅझेट दूर ठेवल्यास आक्रमक होतात. शिवाय, त्यांच्यात अस्वस्थता वाढणे, तोडफोड करणे, स्वत: ला कोंडून ठेवणे, नैराश्य येणे, नकार ऐकण्याची मनस्थिती संपणे, संवेदनांची जाणीव नं होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे जर अशी लक्षणे मुलांमध्ये दिसली तर, त्यांची समस्या घेणे हेच महत्त्वाचं असल्याचं प्राध्यापक आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. युसूफ माचिसवाला यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -