मुंबईकरांनी करून दाखवलं! गेल्या १५ वर्षांतलं सर्वात कमी ध्वनी प्रदूषण!

noise pollution (photo - the new yorker)

दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतषबाजी हे सूत्र ठरलेलं आहे. दरवर्षी मुंबईकर मोठ्या संख्येने आणि त्याहून मोठ्या आवाजाचे फटाके वाजवत असतात. त्यामुळे मुंबईकरांना आनंद जरी मिळत असला, तरी मुंबईच्या ध्वनीप्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडत होती. त्यासोबतच मुंबईतल्या हवेची पातळी देखील खालावत जात होती. या पार्श्वभूमीवर यंदा कोरोनाच्या काळात मुंबईकर काय करतील? असा भितीवजा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मुंबई महानगर पालिकेने देखील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दिवाळी काळात कमी आवाजाचे आणि कमी प्रमाणात फटाके वाजवण्याचे निर्देश मुंबईकरांना दिले होते. या पार्श्वभूमीवर आवाज फाऊंडेशनने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीमध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचं मोजमाप केलं. यंदा मुंबईत गेल्या १५ वर्षांतलं सर्वात कमी ध्वनीप्रदूषण नोंदवलं गेल्याचं समोर आलं आहे. मुंबई मिररने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

कोरोनाच्या काळात फटाक्यांमुळे वायूप्रदूषण झाल्यास त्याचा फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो आणि त्यातून कोरोनाचा धोका अधिक वाढू शकतो, या शक्यतेतून राज्य सरकारने कमी आवाजाचे आणि कमी वायूप्रदूषण करणारे फटाके वाजवण्याचं आवाहन केलं होतं. मुंबई महानगर पालिकेने देखील तशी नियमावली जाहीर केली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच फटाके वाजवण्याची देखील परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा मुंबईच्या वातावरणावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता वर्तवली जात होती.

आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितल्याप्रमाणे, यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी ८ ते रात्री १० या वेळेत शांतता क्षेत्र असलेल्या शिवाजी पार्क मैदानात १०५.५ डेसिबल इतक्या आवाजाची नोंद झाली. याआधीच्या वर्षांची आकडेवारी पाहाता २०१९ मध्ये ११२.३ डेसिबल, २०१८मध्ये ११४.१ डेसिबल आणि २०१७मध्ये ११७.८ डेसिबल इतक्या आवाजाची नोंद झाली होती.