पालिका अधीक्षकाला मारहाण करणारा पोलिसांच्या ताब्यात

MLA Raees Sheikh alleges that corruption is taking place in Mumbai Municipal Corporation

मुंबई -: थकीत मालमत्ता कर वसुलीबाबतची नोटीस बजावणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या मालमत्ता थकबाकीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबई महापालिका करनिर्धारण व संकलन खात्याकडून कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांकडून वसुली करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. याचअंतर्गत पालिकेच्या संबंधित खात्याचे अधिक्षक दशरथ घरवाडे हे बुधवारी रात्रीच्या सुमारास फोर्ट परिसरात अश्विन शहा यांच्याकडे गेले होते.

अश्विन शहा यांच्या मालकीच्या फोर्ट परिसरात तीन इमारती असून त्यांनी पालिकेचे गेल्या १० वर्षांपासून मालमत्ता करापोटी ४३ लाख रुपये थकवले आहेत. त्यावेळी अधिकारी घरवाडे व त्यांच्यासोबत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी, अश्विन शहा यांच्या इमारतीला व गाडीलाही मालमत्ता थकबाकी भरण्याबाबतची नोटीस चिकटवली. त्यावरून या अधिकाऱ्यांना संबंधित मालमत्ता धारक अश्विन शहा यांनी हटकले. यावेळी काही शाब्दिक चकमक झाली. शहा यांनी पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला असून तशी तक्रार अधिकारी दशरथ घरवाडे यांनी माता रमाबाई पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री नोंदवली. त्यामुळे आता कदाचित अश्विन शहा यांना हे प्रकरण जड जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.