घरमुंबईमुंबई विद्यापीठाला फेब्रुवारीमध्ये नॅक

मुंबई विद्यापीठाला फेब्रुवारीमध्ये नॅक

Subscribe

पडताळणीसाठी लवकरच येणारी समिती, कामाला लागण्याच्या कुलगुरूंच्या सूचना

नॅकअभावी दोन वर्षांपासून अनेक राज्य आणि केंद्रीय सवलती, योजनापासून वंचित असलेल्या मुंबई विद्यापीठाला आगामी शैक्षणिक वर्षे सुरू होण्यापूर्वी नॅक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक सोईसुविधांची पाहणी करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये नॅकची समिती येणार आहे. दोन वर्षांपासून नॅक समिती यावी यासाठी मुंबई विद्यापीठाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत होते. अखेर त्याला यश मिळण्याची चिन्हे निर्माण झाली असून, सर्व विभाग प्रमुखांना कामाला लागण्याच्या सूचना कुलगुरूंकडून देण्यात आल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाला 21 एप्रिल 2012 मिळालेल्या नॅक मुल्यांकनाची मुदत 20 एप्रिल 2017 ला संपुष्टात आली. मुल्यांकनाची मुदत संपण्यापूर्वीच विद्यापीठाने नॅकसाठी अर्ज करणे अपेक्षित होते. मात्र नॅक मुल्यांकन मिळण्यासाठी तत्कालिन कुलगुरूंकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून नॅकचा दर्जा नसल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये मुंबई विद्यापीठावर नामुष्कीची वेळ ओढवली होती. विद्यापीठाला नॅक मुल्यांकन नसल्याने प्रशासनावर विविध स्तरातून टीका होत होती. गतवर्षी डॉ. सुहास पेडणेकर यांनी कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नॅक मुल्यांकनासाठी समिती तयार केली. नॅक समितीकडून विद्यापीठाची पाहणी करताना विचारात घेण्यात येणर्‍या मुद्द्यांबाबत समितीकडून अहवाल बनवण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार समितीने अभ्यासक्रम, शिक्षक प्रशिक्षण, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांचे पाठबळ, नेतृत्त्व आणि व्यवस्थापन, संस्थेतील चांगले उपक्रम, माजी विद्यार्थ्यांचे संघटन या बाबींचा अभ्यास करून अहवाल बनवला आहे.

- Advertisement -

अहवाल बनवल्यानंतर तो नॅककडे पाठवण्याबरोबरच विद्यापीठामध्ये आवश्यक पायभूत सुविधा उभारण्याबाबत नुकतीच कुलगुरूंनी विभाग प्रमुखांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना त्यांच्या विभागाचे सादरीकरण करण्यास तसेच सर्व फाईल तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच जानेवारीमध्ये विद्यापीठामध्ये मॉक नॅक व फेब्रुवारीमध्ये नॅक समिती पाहणीसाठी येणार असल्याच्या सूचना देत त्यानुसार तयारी करण्यास सांगितले. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील सर्व विभागाचे विभागप्रमुख कामाला लागले आहेत. तर कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर हे स्वत: रात्रदिवस एक करून जातीने लक्ष घालत असल्याची माहिती मुंबई विद्यापीठातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आली.

येत्या आठ दिवसांत नॅकला ऑनलाईन पद्धतीने अहवाल पाठवण्यात येईल. त्यामुळे पुढील दोन महिन्यामध्ये नॅक समिती पाहणीसाठी येऊ शकते. प्रशासनाकडून सुरू असलेल्या तयारीवर कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर जातीने लक्ष ठेऊन आहेत.
– डॉ. अजय देशमुख, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

- Advertisement -

नॅक मिळाल्याने विद्यापीठाला मिळणारे फायदे
– राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानकडून (रुसा) विविध निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार
– आयडॉलच्या मान्यतेचा मार्ग मोकळा, त्यामुळे दूरस्थ शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा
– केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना विद्यापीठाला मिळण्याचा मार्ग मोकळा

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -