घरमुंबईनवी मुंबई आयुक्तांचा दौरा नागरिकांसाठी की नगरसेवकांसाठी?

नवी मुंबई आयुक्तांचा दौरा नागरिकांसाठी की नगरसेवकांसाठी?

Subscribe

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.रामस्वामी एन. यांचा जनसंवाद शहरातील प्रत्येक भागात सुरू आहे. नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविषयी असलेल्या तक्रारी तसेच विभागात असलेल्या सोयीसुविधा थेट आयुक्तांपर्यंत याव्यात यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. पहिल्या दिवसापासूनच या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मात्र नागरिकांचा हा कार्यक्रम नगरसेवकांनी हायजॅक केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या काळात वॉक विथ कमिशनर हा उपक्रम सुरू केला होता. त्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. मात्र यात मुंढे यांनी नगरसेवकांना कोणतेही स्थान दिले नव्हते. त्यामुळे निव्वळ आयुक्त व नागरिक असा संवाद रंगला होता. त्याचाच कित्ता गिरवत सध्याचे आयुक्त डॉ.रामस्वामी एन.यांनी प्रत्येक विभागात नागरिकांशी जनसंवाद सुरू केले आहेत. या उपक्रमाचे स्वागत करत नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या त्या विभागातील नगरसेवक देखील यात सामील होत आहेत. शांत स्वभावाचे असलेले आयुक्त नगरसेवकांना मान देऊन चर्चा करत असल्याने मात्र नागरिकांना ताटकळत बसावे अथवा उभे राहावे लागत आहे.नगरसेवक हे दररोज विविध सोयीसुविधांसाठी आयुक्तांची भेट घेत असतात.आयुक्तांची भेट घेण्यासाठी नगरसेवकांना वेळेची कोणतीही अट वा बंधन नसल्याचे दिसून येते. सामान्य नागरिकांसाठी मात्र आयुक्तांच्या भेटीची वेळ ही ४ ते ५ आहे.

- Advertisement -

सामान्य नागरिकाला मात्र आपली नोकरी सोडून आयुक्तांच्या भेटी घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आयुक्तांनी स्वतःहून आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमामुळे नागरिकांना आयुक्तांसामोर परिसरातील गार्‍हाणी मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यातच काही नागरिक हे आपापल्या प्रभागातील नगरसेवकांच्या कामावर नाराज असल्याने त्यांच्यासाठी थेट शहराचे निर्णय घेणार्‍या अधिकार्‍यासमोर तक्रारी व अडचणी मांडण्यास मिळत आहेत. त्यात आयुक्तांच्या भेटीला येणारे नगरसेवक टोकन न घेता आयुक्तांना आपल्या कार्यकर्त्यांसोबत भेटत आहेत. त्यामुळे या भेटीत भरपूर वेळ वाया जात असल्याने करदात्या नागरिकास मात्र न्याय मिळत नसल्याची भावना रुजू होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिक निराश होऊ लागले आहेत. जनसंवाद नागरिकांसाठी की नगरसेवकांसाठी असा प्रश्न खुद्द नागरिकच विचारू लागले आहेत. त्यामुळे आयुक्त यापुढील दौर्‍यात तरी फक्त नागरिकांसाठी वेळ देणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -