घरमुंबईशिवसेनेला संपविण्याचा राष्ट्रवादीचा घाट; भाजप नेते आशीष शेलार यांचा आरोप

शिवसेनेला संपविण्याचा राष्ट्रवादीचा घाट; भाजप नेते आशीष शेलार यांचा आरोप

Subscribe

मुंबई – ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला राज्यभरात अभुतपूर्व यश मिळाले आहे. भाजप हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष झाला असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माणसामुळेच हे यश भाजपला मिळाले आहे, असा दावा करत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संपविण्याचा घाट घालत आहे, असा आरोप केला.

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष हा राज्यातला दोन नंबरचा पक्ष झाला असून शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला आहे. हीच भीती, संशय आणि आरोप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार उद्धव ठाकरेंना सांगितला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवू पाहत आहे, हे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आतातरी उद्धव ठाकरे यांचे डोळे उघडतील, अशी आशा करुया असेही शेलार म्हणाले.

- Advertisement -

मुंबईत भाजपतर्फे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेबाबतची  माहिती  आशीष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी ग्रामपंचायत निकालावर बोलताना शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली. यावेळी  विधान ‍ परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर,‍ विधान परिषदेतील प्रतोद आमदार प्रसाद लाड आदी उपस्थित होते.

भाजपकडे पहिल्यांदाही मराठी मतं होती, आजही आहेत. ज्यावेळेला शिवसेनेने असा दावा करायला सुरुवात केली की, गणेशोत्सव म्हणजे आम्ही, दहीहंडी म्हणजे आम्ही, त्यांना आता भाजपाने सत्याचा आरसा दाखविला आहे. भाजप सणात कधीही राजकारण आणत नाही. सणात केवळ आम्ही सहभाग घेतो. यावर्षी दहीहंडी असो वा गणेशोत्सव, त्यात  मुंबईतील मंडळाची सहभागिता कुणाच्या बाजूने आहे हे दिसले, असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला.

- Advertisement -

या स्पर्धेची तुलना आम्हाला करायची नाही. पण मुंबई महानगरपालिकेच्या स्पर्धेत ८० मंडळे सहभ्रागी झाली. याउलट मुंबई भाजपने आयोजित केलेल्या स्पर्धेत तब्बल १ हजार २६ मंडळांनी सहभाग घेतला. इतरांपेक्षा भाजपच्या स्पर्धेला दहा पट सहभागिता मिळाली. या स्पर्धेचे विजेते ठरविण्यासाठी ३० तज्ञ गटांची स्थापना करण्यात आली होती. स्पर्धेत प्रथम फेरीत ६७ मंडळ पात्र झाले. त्यापैकी २१ मंडळाची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या सहा विभागातून समप्रमाणात पारितोषिकाचे वितरण होईल. मूर्तीची सुबकता, सजावट, स्वच्छता आणि सामाजिक संदेश या निकषांवर निष्पक्ष निर्णय घेऊन स्पर्धा समितीने २१ विजेत्यांची निवड केली आहे.विशेष म्हणजे स्पर्धेच्या ५०० रुपये प्रवेश शुल्कातून जमा झालेले ५ लाख १३ हजार रुपये हे पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आले आहेत, अशी माहिती शेलार यांनी दिली.

या स्पर्धेचा पारितोषिक सोहळा  २० सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता दादर येथील शिवाजी मंदीर येथे होत आहे. सोहळ्याला  उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे  उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -