घरमुंबईअकरा निविदा मागवूनही कुर्ल्यातील नालेसफाईकडे कंत्राटदारांची पाठ

अकरा निविदा मागवूनही कुर्ल्यातील नालेसफाईकडे कंत्राटदारांची पाठ

Subscribe

छोट्या नाल्यांची सफाई एनजीओ करणार

मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. परंतु मुंबईतील बहुतांशी भागातील मोठ्या नाल्यांची सफाई होत असली तरी प्रत्यक्षात कुर्ला ‘एल’ विभागातील छोट्या नाल्यांच्या सफाई कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. तब्बल ११ वेळा निविदा मागवूनही या भागातील छोट्या नाल्यांची सफाई करण्यासाठी एकही कंत्राटदार कंपनी पुढे आलेली नाही. त्यामुळे आता खासगी स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ)मदतीने या भागातील नाल्यांची सफाईचे काम करावे लागणार आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने पावसाळ्यापूर्वी ७० टक्के आणि पावसाळ्यात २० टक्के आणि पावसाळ्यानंतर १० टक्के अशाप्रकारे छोट्या व मोठ्या नाल्यातील गाळाची सफाई करण्यासाठी कंत्राट कंपन्यांची नेमणूक केली जाते. त्यानुसार महापालिकेच्यावतीने मिठी नदीची सफाईसह शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील मोठ्या व छोटे नाल्यांच्या सफाई कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यातील पात्र कंत्राट कामांच्या प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरीही दिली आहे. तर ज्या कामांच्या निविदा उशिराने पूर्ण झाल्या, त्यातील दोन कामांच्या प्रस्तावांनाही मागील स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. परंतु सफाईच्या कामांचे प्रस्ताव फेब्रुवारीमध्येच मंजुरीला देण्यात आल्याने याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १ एप्रिलपासून मिठी नदीसह मोठ्या व काही भागातील छोट्या नाल्यांच्या सफाई कामाला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या पर्जन्य जलविभागाच्या अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील बहुतांशी सर्वच प्रकारच्या नालेसफाई कामाला सुरुवात झालेली आहे. कुर्ला ‘एल’ विभाग वगळता अन्य भागातील छोट्या नाल्यांच्याही सफाई कामाला सुरुवात झाल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. कुर्ला एल विभागातील छोट्या नाल्यांमधील गाळाची सफाई करण्यासाठी महापालिकेच्यावतीने तब्बल ११ वेळा निविदा मागवूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मान्यतेने या भागातील नालेसफाई ही खासगी स्वयंसेवी संस्थांच्यावतीने करून घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एल विभागातील छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी मागील पावसाळ्यात नेमण्यात आलेल्या कंपनीला मोठ्याप्रमाणात दंड आकारला होता. त्यामुळे या भागात मोठ्याप्रमाणात झोपडपट्टी परिसर असल्याने, त्यातील नाल्यांची सफाई करताना येणारी अडचण, लोकांकडून होत असलेला त्रास यामुळेच कंत्राटदार पुढे आला नसल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात कुर्ला ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजु यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ‘एल’ विभागातील छोट्या नाल्यांची सफाईसाठी कंत्राटदार नियुक्त केला नसल्याने आता खासगी स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

पुन्हा वळले एनजीओकडे

मुंबईतील छोट्या नाल्यांची सफाई यापूर्वी ‘एनजीओ’ कामगारांकडून करून घेतली जायची. परंतु या संस्थांना काम देणे बंद करून हे काम कंत्राटदारांकडून करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागील वर्षापासून कंत्राटदारांमार्फत ही सफाई होते. परंतु यंदा एल विभागात पुन्हा एकदा एनजीओंची मदत घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -