घरताज्या घडामोडीपैसे भरुनही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये 'नो एंट्री'

पैसे भरुनही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये ‘नो एंट्री’

Subscribe

सरकारी कर्मचाऱ्यांच्या दादागिरीपुढे महापालिकेचे काही चालेना

‘कोविड १९’ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही महापालिकेचा कर्मचारी आपली सेवा बजावत आहे. या कर्मचाऱ्यांना वाहनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेने बेस्टला पैसे भरुन कर्मचाऱ्यांना मोफत बस सेवा देण्यास सुरुवात केली. परंतु महापालिकेने बेस्टला पैसे दिले असले तरी मोफत प्रवासाचा लाभ सरकारी कर्मचारी घेत असून पैसे भरल्यानंतरही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना भरुन आलेल्या बस सोडत पाठच्या बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर, सेवेत बोलावलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पूर्वी तिकीट काढून प्रवास करावा लागत असे. परंतु लॉकडाऊनच्या काळात आपत्कालिन सेवा देण्यासाठी महापालिकेचे अधिक कर्मचारी असल्याने, महापालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला निधी वर्ग करून त्याबदल्यात कर्मचाऱ्यांना मोफत बस सेवा देण्याची सूचना केली. तेव्हापासून बेस्टचा प्रवास हा महापालिका कर्मचाऱ्यांसाठी मोफत बनला असला तरी प्रत्यक्षात महापालिकेच्या कर्मचाऱ्यासाठी बसच उपलब्ध होत नाही. महापालिकेच्या मुख्यालयासह विविध कार्यालयांमधून जाणाऱ्या प्रवाशांना नेहमीची भरलेल्या बसमुळे पुन्हा एकदा पाठून येणाऱ्या बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागते.

- Advertisement -

हेही वाचा – बापरे! मुंबईत ८३ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत, राजेश टोपेंची धक्कादायक माहिती


बऱ्याच वेळा बॅकबे डेपो आणि मंत्रालय आगार आदींमधून बस सोडल्या जातात. परंतु या बसेस सरकारी कर्मचाऱ्यांमुळे फुल्ल झालेल्या असतात. त्यामुळे महापालिका मुख्यालयाजवळ कामावरुन सुटल्यानंतरही कर्मचाऱ्यांना एक ते दीड तासांपेक्षा अधिक प्रतीक्षा करावी लागते. तर बऱ्याच वेळा पुढून येणाऱ्या बसमध्ये जागा असल्या तरी सरकारी कर्मचारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बसमध्ये घेत नाहीत. तुमची बस वेगळी आहे, अशी कारणे देत आत शिरण्यापासून अडवतात. परंतु महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सेंट्रल बाजुला जाणारी एखादी बस सोडली तरी वेस्टर्न बाजुला स्वतंत्र अशी एकही बस नाही. महापालिकेने बेस्टला पैसे भरल्याने, बसमध्ये जागा असल्यानंतर चालक आणि वाहकांनी हस्तक्षेप करत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बसमध्ये जागा द्यायला हवी. परंतु तसेही होत नाही. त्यामुळे यापुढे महापालिका मुख्यालयासमोरील बस डेपोतून बसेस सोडल्या जाव्यात. जेणेकरून अशाप्रकारचे वाद निर्माण होणार नाही आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बस सेवा उपलब्ध होईल,अशी मागणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

- Advertisement -

महापालिकेने बेस्टला पैसे दिले असले तरी याचा सर्वाधिक फायदा सरकारी कर्मचारीच घेत असल्याने एकप्रकारे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी बस पकडताना ‘सोशल डिस्टन्सिंग’चा बोऱ्या वाजला असून या नियमांचे पालन करणारा कामगार मागेच राहतो आणि त्यांच्या नशिबी एक ते दीड तासांचा विलंब येतो अशीही भावना कर्मचारी व्यक्त करताना दिसत आहे.

बेस्ट उपक्रमाने जास्त कामगार असल्यास त्यांच्यासाठी बस सोडण्याची तयारी दर्शवली आहे.परंतु महापालिकेच्या कामगारांपैकी किती कामगार सेंट्रल बाजुस किंवा वेस्टर्न अथवा हार्बर बाजुस राहतात याचीच नोंद नाही . त्यामुळे अशाप्रकारे जर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपले गट तयार करून एकगट्टा प्रवाशांची संख्या दर्शवल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र बसची सुविधा होवू शकते,असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -