घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टउत्तर मुंबई भाजपाचा अभेद्य गड

उत्तर मुंबई भाजपाचा अभेद्य गड

Subscribe

उत्तर मुंबई हा मतदारसंघ तसा भाजपाचा बालेकिल्लाच राहिलेला आहे. सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून येत राम नाईक यांनी हा गड राखला होता. भाजपा आणि शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडून येणार्‍या नाईक यांना २००४ मध्ये अभिनेता गोविंदा यांनी पराभूत करून युतीच्या ताब्यातील हा मतदारसंघ काँग्रेसने काबीज केला. त्यानंतर संजय निरुपम यांनी निवडून येत हा गड काँग्रेसकडे खेचून आणला होता. परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेचे उमेदवार म्हणून गोपाळ शेट्टी येथून तब्बल साडेचार लाख मताधिक्यांनी निवडून आले. मात्र युतीतील धुसफुशीमुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या, परंतु अखेर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी युती होणार हे जाहीर करून टाकले. पण ही युती झाली नसती तरीही उत्तर मुंबईचा गड एकहाती निवडून आणण्याची ताकद भाजपामध्ये आहे. युती झाली नसती तरीही शेट्टी दोन लाख मतांनी निवडून येण्याचा दावा भाजपाकडून केला जातो, तिथे युती झाल्याने हे मताधिक्य आता अधिकच होण्याची शक्यता आहे.

मराठी,उत्तर भारतीय,गुजराती आदी भाषिकांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे. दहिसर, बोरीवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोपर आणि मालाड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश यामध्ये आहे. त्यातील चार विधानसभा या भाजपाकडे, एक शिवसेनेकडे आणि एक काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आज जरी युती झाली असली तरी स्वबळावर निवडणूक लढल्यानंतर भाजपाने आपली ताकद उत्तर मुंबईत दाखवून दिली आहे.विधानसभा निवडणूक स्वबळावर लढल्यानंतर महापालिकेची २०१७ ची सार्वत्रिक निवडणूकही दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढली. त्यामुळे भाजपाची ताकदही दुपटीने वाढलेली पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत उत्तर मुंबईतून केवळ ११ नगरसेवक असलेल्या भाजपाने २०१७ च्या निवडणुकीत तब्बल आपल्या नगरसेवकांची संख्या २४ वर पोहोचवली आहे. अर्थात या मतदारसंघात ३८ नगरसेवकांच्या तुलनेत ही संख्या ४२ झाली आहे. परंतु या ४२ नगरसेवकांपैकी निम्म्यापेक्षा जास्त अर्थात २४ नगरसेवक एकट्या भाजपाचे आहेत आणि उर्वरित १२ नगरसेवक शिवसेनेचे आहेत. ही संख्या यापूर्वीच्या महापालिका निवडणुकीत दुप्पट होती.

- Advertisement -

या मतदारसंघातून यापूर्वी काँग्रेसच्या तिकीटावर संजय निरुपम यांनी निवडणूक लढवली होती. परंतु भाजपाची वाढती ताकद लक्षात घेता खुद्द निरुपम यांनीही या मतदारसंघाऐवजी गुरुदास कामत यांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. निरुपम वगळता उत्तर मुंबईतून काँग्रेसचा चेहराच नसल्याने अन्य कुणाचीही डाळ इथे शिजणे कठीण झाले आहे. त्यामुळेच गोविंदाप्रमाणे अभिनेत्री नगमा यांना उमेदवारी देवून शेट्टी यांना काटशह देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. शेवटी आता काँग्रेस पक्ष कुणाला उमेदवारी देतो आणि भाजपाच्या विरोधात प्रचाराची रणधुमाळी निर्माण करत मतांचा कौल आपल्या बाजूने फिरवून घेतो का, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

मतदारसंघाचा क्रमांक – २६

- Advertisement -

नाव – मुंबई उत्तर

मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

संबंधित जिल्हे – मुंबई उपनगर

एकूण मतदार(२०१४) – ९ लाख ४५ हजार ६४२

महिला मतदार – ४ लाख १८ हजार ३९४

पुरुष मतदार – ५ लाख २७ हजार २४७

२०१४ मधील आकडेवारी

गोपाळ शेट्टी – भाजप – ६ लाख ६४ हजार ००४

संजय निरूपम – काँग्रेस – २ लाख १७ हजार ४२२

सतीष जैन – आप – ३२ हजार ३६३

नोटा – ८ हजार ७५८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -