घरCORONA UPDATEमुंबईतील २५६ शालेय इमारतींमध्ये आता क्वारंटाईन; १८ ते २० हजार लोकांची क्षमता

मुंबईतील २५६ शालेय इमारतींमध्ये आता क्वारंटाईन; १८ ते २० हजार लोकांची क्षमता

Subscribe

मुंबईतील विविध भागांमधील २५६ इमारतींची यादी निश्चित करून महापालिकेला शिक्षण विभागाने सुपूर्द केली आहे.

मुंबईत कोरोना विषाणूचा संसर्ग अधिकप्रमाणात पसरण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेच्यावतीने क्वारंटाईन सेंटरची संख्याही वाढवण्यात येत आहे. त्यामुळे आता महापालिका शाळांचाही वापर आता क्वारंटाईनसाठी केला जाणार आहे. यासाठी मुंबईतील विविध भागांमधील २५६ इमारतींची यादी निश्चित करून महापालिकेला शिक्षण विभागाने सुपूर्द केली आहे. त्यामुळे शालेय इमारतींमध्ये सुमारे १८ ते २० हजार लोकांच्या क्वारंटाईनची क्षमता असून प्रत्येक विभाग कार्यालयांकडून आवश्यकतेनुसार याचा वापर केला जाणार आहे.

मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रयत्न केला जात असून कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्यांच्या अति निकटच्या संपर्कातील व त्याखालोखाल संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन केले जाते. महापालिका आयुक्तांनी सर्व विभागीय सहायक आयुक्तांना क्वारंटाईन करता विभागातील हॉटेल, लॉज, जिमखाने तसेच बांधकाम पूर्ण झालेल्या रिकाम्या इमारतींसह वास्तू ताब्यात घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या वास्तू विभागीय सहायक आयुक्तांनी ताब्यात घेतल्यानंतर भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची भीती लक्षात घेता क्वारंटाईनची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न महापालिकेकडून होत आहे. याचा एक भाग म्हणून महापालिकेच्या शाळा क्वारंटाईनसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

महापालिका प्रशासनाच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने प्रत्येक विभागातील सुस्थितीतील शाळा तसेच किरकोळ कामे करावे लागतील अशाप्रकारच्या शाळांची यादी तयार केली. मुंबईतील एकूण २७६ शालेय इमारतींची यादी गुरुवारी अंतिम करून महापालिका प्रशासनाला सादर करण्यात आली आहे. त्यानुसार आता प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या हद्दीतील महापालिकेचे अधिकारी व शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी हे संयुक्त पाहणी करून त्याचा वापर कसा करावा किंवा त्यामध्ये काय सुधारणा केली जावी याबाबतचा निर्णय घेवून त्यांचा वापर क्वारंटाईनसाठी करणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून समजते.

महापालिकेच्या शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याशी संपर्क साधला असता, क्वारंटाईनसाठी शालेय इमारतींचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर शिक्षण विभागाच्या प्रत्येक विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा करून त्यानुसार २५६ इमारतींची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार या शाळांचा वापर कशाप्रकारे करायचा याचा निर्णय आता विभागीय सहायक आयुक्त घेतील. परंतु यापूर्वी धारावी काळाकिल्ला, अंधेरी पुनम नगर आणि भांडुप मिठानगर येथील शाळांचा वापर क्वारंटाईन म्हणून करण्यास सुरुवात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर जबाबदारी

महापालिका शाळांचा वापर क्वारंटाईन म्हणून करण्यात येत असल्याने, ज्या शाळांचा वापर होणार आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना तिथे देखभालीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. क्वारंटाईनसाठी या शालेय इमारतीचा वापर करताना, तेथील सामान वस्तू हलवणे, वीज, पाणी तसेच इतर बाबींचे व्यवस्थापन राखण्याचे काम मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर राहणार आहे. मात्र, त्यांच्या क्वारंटाईनमधील लोकांशी कोणताही संबंध येणार नाही. तेथील लोकांची गैरसोय होवू नये म्हणून प्रशासन आणि लोकांमध्ये समन्वयक म्हणून हे शिक्षक भूमिका पार पाडतील. जी शाळा निवडली जाईल, त्याच शाळांमधील शिक्षकांची ऑर्डर काढली जाईल. इतरांची नाही. त्यामुळे सुमारे ५०० च्या लगबग शिक्षकांची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -