घरताज्या घडामोडीOmicron Symptoms : ओमिक्रॉन रिकव्हरीतून मुंबईच्या रूग्णांमध्ये नवे लक्षण, डॉक्टरही हैराण

Omicron Symptoms : ओमिक्रॉन रिकव्हरीतून मुंबईच्या रूग्णांमध्ये नवे लक्षण, डॉक्टरही हैराण

Subscribe

ओमिक्रॉनचा संसर्ग हा सौम्य आजार म्हणून समोर येत असला तरीही आता ओमिक्रॉनच्या संसर्गातून रिकव्हरीनंतर नवीन लक्षणे समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेत ज्या पद्धतीची लक्षणे ओमिक्रॉनच्या निमित्ताने समोर आली होती, तशीच लक्षणे ही मुंबईतील रूग्णांमध्ये दिसून आली आहे. ओमिक्रॉनचा सरासरी मुक्काम आणि शरीरावर होणारा संसर्ग याबाबतही मुंबईतील डॉक्टरांनी काही प्रमुख निरीक्षणे मांडली आहेत. त्यामध्ये कोरोनाचा शरीरावर होणारा परिणाम, ओमिक्रॉन कोणत्या इतर आजाराच्या लक्षणांसारखा आहे, तसेच नव्या लक्षणाचे कारणही मुंबईतील काही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

ओमिक्रॉनच्या बहुतांश रूग्णांमध्ये सौम्य अशा पद्धतीची लक्षणे दिसून आली तरीही या संसर्गातून बाहेर पडणाऱ्यांना एका नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक रूग्णांनी अंगदुखी तसेच दीर्घकाळ अशा अशक्तपणाच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक अशी तक्रार आहे, ती म्हणजे पाठदुखीची. अनेक रूग्णांनी आता पाठदुखीच्या त्रासाबाबतची तक्रार केली आहे.

- Advertisement -

रूग्णांना रिकव्हरीनंतर पाठदुखी

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, विक्रोळी येथे राहणाऱ्या नम्रता (वय ३२) या महिलेला घशाच्या खवखवीचे सुरूवातीचे लक्षण जाणवले. त्यानंतर लगेचच थंडी आणि तापही आला. त्यासोबतच पाय दुखणे आणि पाठदुखीचाही त्रास तिला होत होता. संपूर्ण शरीरातील दुखणे जाणवत होते. अशातच पॅरासिटेमोल खाल्ल्यानंतरही मला पेनकिलर्सची गरज भासली. सततच्या उपचारानंतर तिसऱ्या दिवशी थोडाला दिलासा मिळाला, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. अंधेरीच्या एका महिलेनेही सुरूवातीच्या लक्षणांमध्ये तापासह काही लक्षणे आढळली असल्याचे सांगितले. पण महिलेने वेळीच औषध घेतल्याने ताप नियंत्रणात आला. पण याआधी कधीही पाठदुखील अनुभवली नाही, अशा प्रकारचे दुखणे मी या दिवसांमध्ये अनुभवल्याचा अनुभव महिलेने शेअर केला आहे.

दक्षिण आफ्रिकेसारखीच लक्षणे मुंबईकरांना

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनच्या लक्षणांबाबत झालेल्या अभ्यासानुसार घशाची खवखव हे सुरूवातीच्या काळातील सर्वात महत्वाचे असे लक्षण म्हणून समोर आले होते. त्यासोबतच कोरडा कफ, पाठीच्या खालच्या भागात दुखणे, नाकाला सूज येणे हीदेखील लक्षणे आढळली होती. मुंबईतही डॉक्टरांनी सांगितलेल्या लक्षणांमध्ये ताप आणि डोकेदुखी ही लक्षणे अनेक रूग्णांमध्ये दिसून आली आहेत. त्यापाठोपाठच काही रूग्णांमध्ये अशक्तपणा तसेच मरगळल्यासारखे वाटणे यासारखी लक्षणे दिसून आली आहेत. जवळपास सातव्या ते आठव्या दिवसांपर्यंत ही लक्षणे दिसून येतात, अशी मुंबईकरांच्या लक्षणांमधील माहिती आहे.

- Advertisement -

ओमिक्रॉनची लक्षणे कोणत्या आजारासारखी?

मुंबईच्या रूग्णांमध्ये प्रामुख्याने ताप, डोकेदुखी, पाठदुखी, सौम्य ताप, घशाची खवखव यासारखी फ्लू ची लक्षणे ओमिक्रॉनसाठी दिसून आली आहेत. डेंग्यूच्या रूग्णांमध्येही एरव्ही हाडांचे दुखणे, अंगदुखी आणि पाठदुखी यासारखी लक्षणे दिसतात. अशी लक्षणे रूग्णांमध्ये तीन दिवस आढळतात. त्यानुसारच ओमिक्रॉनच्या रूग्णातही तीन ते चार दिवस ही लक्षणे दिसून येतात. तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती मुंबईतील फिजिशिअन डॉ हेमंत ठक्कर यांनी टीओआयला दिली.

पाठदुखीचे नेमके कारण काय ?

सर जे जे हॉस्पिटलचे मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ हेमंत गुप्ता म्हणाले की अनेकदा औषधांमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या गॅसमुळेही शरीराच्या पाठीच्या खालच्या भागात दुखणे सुरू होते. त्यामध्ये अॅंटीबायोटिक्सचा मोठा वापर असल्यानेच अनेक रूग्णांमध्ये हे लक्षण आढळून आले आहे. अनेक रूग्णांमध्ये विविध प्रकारचे दुखणे हे आढळून आले आहे. पण बहुतांश रूग्णांमध्ये पाचव्या दिवशी RT-PCR चाचणी निगेटिव्ह येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -