घरमुंबईचौथ्या दिवशीही पावसाने मुंबईला झोडपले

चौथ्या दिवशीही पावसाने मुंबईला झोडपले

Subscribe

गेल्या तीन चार दिवसांत मुंबईत ६८३ मिलीमीटर पाऊस झाला असून या पावसाने मुंबईकरांची दैना उडवली आहे.

गेल्या तीन चार दिवसांत मुंबईत ६८३ मिलीमीटर पाऊस झाला असून या पावसाने मुंबईकरांची दैना उडवली आहे.  पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने व पश्चिम, मध्य रेल्वेची सेवा धिम्यागतीने सुरु असल्याने मुंबईकरांची कार्यालयांना सुट्टी झाली. तर अनेकांचा लेटमार्क झाला. कुलाबा येथे १६6 मिलीमीटर, सांताक्रूझ येथे १८४ मिलीमीटर, शहर विभागात १६९ मिलीमीटर, पूर्व उपनगरात १२३ मिलीमीटर, पश्चिम उपनगरात १६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सायंकाळी ५.३० पर्यंत कुलाबा येथे ३९ तर सांताक्रुझ येथे १०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार मुंबईत चार दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे हिंदमाता, परळ, गांधी मार्केट, सायन, चेंबूर, कुर्ला, गोरेगांव, बांद्रा, इत्यादी ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. साचलेल्या पाण्यामधून नागरिकांना बाहेर पडण्यासाठी स्थानिक तरुण रस्त्यावर उतरले होते.

अनेक तुंबलेल्या ठिकाणी लहान मुलांनी आनंद लुटला. मध्ये रेल्वेच्या सायन माटुंगा स्थानकादरम्यान पाणी साचल्याने लोकल धीम्या गतीने चालवण्यात येत होत्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. पश्चिम रेल्वेवर नालासोपारा येथे पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु होती. हार्बर मार्गावरील वाहतूकही १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती. मुंबईची लाईफलाईन बोलली जाणारी रेल्वेसेवा उशिराने धावल्याने लाखो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाणी साचल्याने १२ ठिकाणी बेस्टचे मार्ग वाळवावे लागले.

- Advertisement -

भिंत कोसळण्याच्या घटना

मुंबईत मंगळवारी तब्बल १३ ठिकाणी घराचा काही भाग व भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. तसेच ३0 ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. जोरदार पावसामुळे ४३ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पडण्याच्या तक्रारी पालिकेकडे नोंद झाल्या.

पाणी तुंबलेली ठिकाणे 

हिंदमाता, परळ टीटी, गांधी मार्केट, सायनमधील मुख्याध्यापक भवन, सायन रोड क्रमांक. २४, हेमंत माजरेकर मार्ग, अँटॉप हिल, एन. एम. जोशी मार्ग, वरळी, पूर्व उपनगरात चेंबूरमधील शेल कॉलनी, पोस्टल कॉलनी, कुर्ल्यामध्ये बैल बाजार, शितल सिनेमा, एल. बी. एस. मार्ग तर पश्चिम उपनगरात गोरेगावमध्ये सिद्धार्थ नगर, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज, मिलन सबवे, कपाडिया नगर, बीकेसी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

- Advertisement -

पावसाचा इशारा

येत्या 24 तासांत मुंबई शहर, उपनगरात जोरदार पावसाची तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दोन दिवसांत पडलेला पाऊस

ठिकाण पाऊस (मिमी मध्ये)
परळ            322
वडाळा          319
वरळी           301
माटुंगा           291
बोरिवली         290

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -