घरमुंबईसंभाजीनगरातील राड्यात एकाचा मृत्यू

संभाजीनगरातील राड्यात एकाचा मृत्यू

Subscribe

१४ पोलीस जखमी, ७ जणांना अटक

येथील किराडपुरात रामनवमीच्या पूर्वसंध्येला २ गटात झालेल्या राड्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. शेख मोईनुद्दीन (५४) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. या राड्यात १४ पोलीसही जखमी झाले आहेत. काही पोलिसांना किरकोळ तर काहींना गंभीर मार लागला असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. दरम्यान, किराडपुरा येथे तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी याप्रकरणी ७ संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांना स्थानिक न्यायालयासमोर हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या राड्याप्रकरणी पोलिसांनी जवळपास ५०० अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत २० जणांची ओळख पटली आहे. त्यापैकी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर दंगल करणे, प्राणघातक हत्यारे बाळगणे, जीवानिशी मारणे, सरकारी अधिकार्‍यांवर हल्ला करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात ठिकठिकाणी सीआरपीएफची पथके, दंगल नियंत्रण पथक आणि स्थानिक पोलीस तैनात आहेत.

- Advertisement -

संशयितांवर आणि संशयित वाहनांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. किराडपुरा येथील राममंदिराबाहेर बुधवारी रात्री ११.३० वाजता २ गटांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली होती. त्यातून दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी पोलिसांच्या वाहनांसह अनेक वाहनांना आग लावली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रूधूर आणि सौम्य लाठीमार करावा लागला होता.

मालवणीतील दंगलप्रकरणी २१ जणांना अटक
रामनवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत दगड आणि चपला फेकून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी ४०० जणांविरुद्ध मालवणी पोलिसांनी भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यात आतापर्यंत २१ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी १८ जणांना शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर इतर आरोपींना शनिवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान, ५० ते ७० हून अधिक संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -