ग्रँडरोड, गिरगाव, मलबारहिल, पेडर रोडमधील रुग्ण दरवाढीचे प्रमाण घटले

विभागाच्या सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी भायखळा, माजगाव या महापालिकेच्या ‘ई’ विभागाची प्रभारी जबाबदारी असतानाही या ‘डी’ विभागाकडे लक्ष कमी होवू दिले नाही.

Patient rates in Grand Road, Girgaum, Malabar Hill, Pedder Road decreased
ग्रँडरोड, गिरगाव, मलबारहिल, पेडर रोडमधील रुग्ण दरवाढीचे प्रमाण घटले

कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून मलबार हिल विधानसभा क्षेत्र असलेला महापालिकेचा ‘डी’ विभाग हा दुसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर कायमच होता. परंतु या विभागाच्या सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी भायखळा, माजगाव या महापालिकेच्या ‘ई’ विभागाची प्रभारी जबाबदारी असतानाही या ‘डी’ विभागाकडे लक्ष कमी होवू दिले नाही. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपर्यंत टॉप फाईव्हमधील आपले स्थान सोडून या विभागाने कोरोनाग्रस्तांच्या यादीत १६ व्या क्रमांकांपर्यंत मजल मारली आहे. मात्र, शांत झालेल्या मलबालहिल, नेपियन्सी आदी परिसरांमध्ये पुन्हा एकदा रुग्ण आढळून येत आहे. अर्थात हे रुग्ण म्हणजे नव्याने घरकाम करणाऱ्या नोकरांना कामावर घेण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात येत आहेत. या चाचणींमध्ये बहुतांशी नोकरांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे चित्र समोर येत आहे.

मलबार हिल विधानसभा क्षेत्र मोडणाऱ्या महापालिकेच्या डि विभागात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या सध्या १५५९ एवढी आहे. मात्र, १२ एप्रिल रोजी याच विभागात बाधित रुग्णांची संख्या ९७ एवढी होती. त्यामुळे अवध्या दोन महिन्यांमध्ये ही संख्या १४५० पेक्षा अधिक वाढली आहे. पण सध्या रुग्णांची संख्या १५५९ एवढी झाली असली तरी रुग्ण दरवाढीचे प्रमाण हे २.७ टक्के एवढे आहेत. या विभागात पहिले रुग्ण हे मलबारहिल, नेपियन्सी रोडवर आढळून आले होते. त्यानंतर जसलोक, ब्रिचकँडी व भाटीया रुग्णालयांमध्ये रुग्ण आढळून आले. त्यानंतर माळीभवन, नारायण वाडी, पारेख वाडी, खेतवाडी, उरणकरवाडी, दया सागर झोपडपट्टी, खटावचाळ, बीआयटी चाळ, तुळशीवाडी, शिमला नगर झोपडपट्टी या मोठ्या वस्त्यांसह गायवाडी, श्रीपती कॅस्टल, अटल हाऊस, निकदवरी लेन, खटावकर भवन, गवालिया टँक रोड,  नाना चौक,  लॅमिग्टन रोड, बाबुलनाथ रोड, मुंबई सेंट्रल रोड, पेडर रोड, बी.डी रोड, ताडदेव रोड, तेजपाल रोड आदी भागांमध्ये रुग्ण आढळून येवू लागले.

ई  विभागाच्या सहायक आयुक्तपदी मकरंद दगडखैर यांची नेमणूक केल्यानंतर या विभागाचा प्रभारी चार्ज डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे सोपवले होते. त्यावेळी ‘ई’ विभाग आणि ‘डी’ विभाग हे कोरोनाग्रस्तांच्या यादी वरच्या व खालच्या क्रमांकावर होते. परंतु स्वत:च्या विभागाकडे लक्ष वेधतानाही ‘ई’ विभागाकडे तेवढ्याच कल्पकतेने गायकवाड यांनी लक्ष देत दोन्ही विभागांमधील रुग्ण दरवाढीचे प्रमाण कसे कमी होईल यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यामुळेच दोन महिन्यांनंतर डि विभागासह ‘ई’ विभागही आता आता खालच्या क्रमाकांवर आला आहे.

सध्या या विभागात रुग्ण दरवाढीचे प्रमाण हे २.२४ एवढे असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ३० दिवसांवर आला आहे. तुळशीवाडीचा परिसर, खेतवाडी आणि बीआयटी चाळींमध्ये सध्या काही प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. या विभागात जे एकूण रुग्ण आढळून आले आहेत, त्यातील ५० ते ६० टक्के रुग्ण हे तीन प्रमुख रुग्णालयांसह आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलीस, महापालिका, रेल्वे आदींमधील कर्मचारी आहेत. मात्र, बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेवून त्यांची जास्तीत जास्त चाचणी करण्यावर आम्ही सुरुवातीपासून भर दिला होता. त्यामुळे या विभागातील रुग्णांची आकडेवारी सुरुवातीपासून वाढलेली पहायला मिळत होती. परंतु आज इमारतीतील लोकांपेक्षा झोपडपट्टींमधील लोकांपर्यंत पोहोचून त्यांची तपासणी करून त्यातून रुग्ण शोधणे हीच महत्वाची बाब आहे. त्यामुळे याकडेच आम्ही अधिक भर दिला असल्याचे ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी स्पष्ट केले. सध्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये ‘सीसीसी टू’ची व्यवस्था केली आहे. शिवाय एका एसआरएच्या इमारतीतही ५०० खाटांची व्यवस्था केली आहे. या एकाच इमारतीतील काही मजल्यावर ‘सीसीसी वन’ची तर काही मजल्यांवर ‘सीसीसी टू’ची व्यवस्था केली आहे. याठिकाणी ऑक्सिजन रुपांतरीत खाटांचीही व्यवस्था केली असून जर ‘सीसीसी वन’मधील कुणी संशयित रुग्ण बाधित झाल्यास त्याच इमारतीतील ‘सीसीसी टू’मध्ये हलवले जात. त्यामुळे रुग्णासह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचीही पळापळ होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या जे काही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे, त्यामध्ये घरकाम करणाऱ्या नोकरांचा समावेश आहे. जुने कामगार गावी गेल्याने नवीन कामगारांना घरकामासाठी नेमताना त्यांची चाचणी केली जाते. त्यामध्ये बरेचसे कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुगभाट लेन, खाडिलकर रोड, मुंबादेवी आदी भागांमध्ये सध्या रुग्ण आहेत. मात्र, जोवर लोक रस्त्यांवर कमी गर्दी करत नाही तोवर हा आजार नियंत्रणात येणारा नाही. महापालिकेच्यावतीने रेशनकार्ड नसलेल्यांना रेशन उपलब्ध करून दिले जाणार होते. परंतु आमच्याकडून त्यांचे नंबर आणि आधारकार्ड क्रमांक घेवूनही दिले नाही. त्यामुळे मग मी स्वत: आणि आमदार मंगलजी लोढा यांच्या माध्यमातून जीवनावश्यक किटचे वाटप केले आहे. शिवाय आता प्रत्येक सोसायटी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना थर्मन गन मशीन व ऑक्सिमीटर उपलब्ध करून देत आहे. याबरोबरच मास्क, आर्सेनिक अल्बम व आयुष काढ्याच्या पाकीटांचेही वाटप केले. – अनुराधा पोतदार-झव्हेरी, स्थानिक नगरसेविका, भाजप

माझ्या विभागात गाडी अड्डा, तुळशीवाडी, गोकुळधाम आदी भागांमध्ये रुग्ण आहेत. आतापर्यंत आढळून आलेले बरेच रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. नायर रुग्णालयांमध्ये एकवेळ रुग्णाला खाट मिळेल, पण येथील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखलच करून घेतले जात नाही. मग तो कोविडचा असो वा नॉन कोविड. किमान रुग्णालयात आल्यानंतर ओपीडीमध्ये प्रथमोपचार केल्यास रुग्णांना बरे वाटू शकते. पण तेही केले जात नाही. त्यामुळे याबाबत आम्ही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निदर्शनासही ही बाब आणली आहे. विभागातील लोकांसह काही वृत्तपत्र विक्रेते यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले असून आता घरोघरी दहा मास्क आणि सॅनिटायझर्सचे वाटपही केले जात आहे. – अरुंधती दुधवडकर, स्थानिक नगरसेविका, शिवसेना

पोलीस कंपाऊंड, एम.पी. मिल कंपाऊंड आदी ठिकाणी रुग्ण आहेत. परंतु सध्या सर्वांत मोठी समस्या आहे, ती कोविडच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी, त्यांच्यासाठी ना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत, ना रुग्णालयांमध्ये व्यवस्था होत. प्रत्येक रुग्णाला दाखल करण्यासाठी दहा ते बारा तासांचे प्रतीक्षा करावीच लागते. सुरुवातीला काही प्रमाणात सॅनिटायझेशच्या अडचणी होत्या. पण आता व्यवस्थित सॅनिटायझेशन होते. आतापर्यंत आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, मास्कचे वाटप तसेच दोन हजाराहून अधिक जीवनावश्यक किटचे वाटप केले आहे. – सरीता पाटील, स्थानिक नगरसेविका,भाजप