घरमुंबईरुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाईकांनी केली तोडफोड, नर्सचाही विनयभंग!

रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाईकांनी केली तोडफोड, नर्सचाही विनयभंग!

Subscribe

उपचार सुरू असताना एका ४८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी महापालिकेच्या वाशी रुग्णालयावर चॉपर आणि तलवारींनी हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या नातेवाईकांनी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड करून डॉक्टरांना मारहाण केली. परिचारिकांना शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केला. डायलेसिस मशिन आणि व्हेंटिलेटर फोडले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आयसीयु आणि आसपासच्या वॉर्डमधील रुग्ण घाबरून गेले. या प्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार आरोपींना गजाआड केले आहे.

जुहू गावात राहणारे व्यंकटेश सुर्यवंशी (४८) हे दुर्धर विकाराने आजारी पडल्यानंतर त्यांना प्रथम कोपरखैरणे येथील आशिर्वाद रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना मंगळवारी दुपारी महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी नॉन कोविड विभागात त्यांचा उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. सुर्यवंशी यांच्या मृत्युची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळल्यानंतर ते पहाटे चारच्या सुमारास रुग्णालयात आले. त्यांनी प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यापैकी काहीजण तलावर आणि चॉपरसारखे घातक शस्त्र घेऊन रुग्णालयात घुसले. त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांसह डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केली. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी संदेश सुर्यवंशी (२०), रूपेश सुर्यवंशी (२१), पंकज जाधव (२२) आणि रोहित नामवाड (३२) या चार आरोपींना अटक केली आहे. अन्य फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisement -

व्हेंटिलेटर फोडले

रुग्णालयात घुसलेले हे हल्लेखोर फक्त डॉक्टरांना मारहाण करून थांबले नाहीत, तर त्यांनी प्रचंड तोडफोड केली. या हल्ल्यात अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर आणि डायलेसिस मशिनचे प्रचंड नुकसान झाले. हे सर्वच हल्लेखोर नशेमध्ये असल्याचा आरोप रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी केला आहे.

डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

पहाटे घडलेल्या या प्रकारानंतर वाशी रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिकांनी आज सकाळी कामबंद करून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी रुग्णालयात पोलीस तैनात करण्यात यावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -