घरमुंबईप्लास्टिक कचर्‍याच्या विल्हेवाटीची समस्या

प्लास्टिक कचर्‍याच्या विल्हेवाटीची समस्या

Subscribe

2 ऑक्टोबर रोजी गावागावात स्वच्छता अभियान राबवण्यात आल्यानंतर गावात साचलेला प्लास्टिक कचरा पंचायत समितीने मागवून घेतला. मात्र यातील चांगले प्लास्टिक नेण्यात आले आणि खराब प्लास्टिक पंचायत समितीसमोर तसेच पडून राहिल्याने याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न उभा राहिला आहे.

तालुक्यात दहा वर्षांपासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, संत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले. यामध्ये अनेक ग्रामपंचायतीनी जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर पुरस्कार प्राप्त केला, तर ७० हून अधिक ग्रामपंचायती निर्मल ग्राम स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळालेल्या आहेत. मात्र नंतरच्या काळात ही योजना कागदावरच अधिक दिसून आली. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींमध्ये देखील दुर्लक्षच दिसून आले. ज्या ग्रामपंचायतीला पुरस्कार प्राप्त झाला अशा गावात देखील आता कचरा समस्या बिकट झाली आहे. कचर्‍याची स्थिती जैसे थे आहे. गावाच्या वेशीवर आणि रस्त्यालगत, नदी नाल्यात, कचरा टाकला जात आहे. पुरस्कार उल्लेखाच्या कमानी मात्र गावाच्या प्रवेशद्वारावर उभ्या केल्या गेल्या, कचर्‍याची समस्या तशीच राहिली आहे. या कचर्‍यामध्ये प्लास्टिक सर्वांचीच डोकेदुखी झाली आहे.

- Advertisement -

स्वच्छता अभियाना दरम्यान ग्रामीण भागात गोळा केलेला प्लास्टिक कचरा जिल्हा स्तरावर काम करणारी गो ग्रीन नावाची संस्था उचलून नेणार होती. मात्र या संस्थेने यातील चांगले प्लास्टिक उचलून नेले आणि उर्वरित खराब प्लास्टिक तसेच ठेवले. यामुळे हा प्लास्टिक कचरा येथे पंचायत समितीच्या आवारात पडून राहिल्याने याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न पंचायत समिती प्रशासनापुढे पडला आहे. रायगड जिल्ह्यातील ७९६ ग्रामपंचातींनी हा उपक्रम राबवला. ग्रामीण भागात हे अभियान राबवले असले तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा गावागावात पडून आहे.

प्लास्टिक कचरा जमिनीत तसाच राहत असल्यामुळे शेती, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आणि जनावरांना धोका निर्माण होतो. यामुळे प्लास्टिक मुक्ती करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती आणि अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सुरूवातीला जागृती करून त्यानंतर कायदेशीर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायत स्तरावर झाली पाहिजे. ग्रामीण भागात आणि शहरी भागात प्लास्टिक वापर नियंत्रणात आणणे आपली जबाबदारी आहे.
-जयवंत गायकवाड, जिल्हा स्वच्छता समन्वयक

- Advertisement -

चांगला प्लास्टिक कचरा उचलून नेण्यात आला. मात्र खराब प्लास्टिक नेले नसल्याने त्याचे काय करायचे हा प्रश्नच आहे.
-प्रमोद गोडांबे, गट विकास अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -