घरमुंबईनाटककार वामन तावडे कालवश

नाटककार वामन तावडे कालवश

Subscribe

 छिन्न नाटकाने रंगभूमी गाजवून सोडणारे प्रतिभावान नाटककार वामन तावडे यांचे मंगळवारी ७ मे रोजी निधन झाले. चार दिवसांपूर्वी छातीत दुखत असल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या मागेत्यांच्या मागे पत्नी, कन्या,जावई आणि नात असा परिवार आहे. बुधवारी सकाळी मुलुंड पूर्व येथील स्मशानभूमीतत्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

कन्संट्रक्शन, पिदी, मी घोडा हुसेनच्या चित्रातला, रायाची रापी आदी एकांकिका तसेच छिन्नसह इमला, रज्जू, चौकोन आदी नाटकांनी तावडे यांनी रंगभूमीवर आपली छाप पाडली होती. वेगळ्या पठडीतील नाटके लिहिणार्‍या तावडे यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

कन्नमवार नगर विक्रोळी येथे राहणारे तावडे गेली काही वर्षे मुलुंडला राहत होते. श्रमिक, शोषित समाज वेदनेचा आविष्कार आपल्या नाटकातून मांडणार्‍या तावडे यांचे छिन्न नाटक पाहून झाल्यावर प्रेषक सुन्न होत. गेली काही वर्षांपासून ते रंगभूमीच्या मुख्य प्रवाहापासून थोडे दूर गेले होते. पण, आता ते नव्या दमाने लिखाण करण्यासाठी सज्ज झाले होते.

- Advertisement -

वास्तववादी नाटकवाला!

’सारं आभाळ ढगाळ, काया पिशी झाली काळ, चिंब सरण सरण, जित्ता आत परि जाळ’ अशा घनगर्द गहिर्‍या शब्द आणि आशयाची कविता ’छिन्न’ नाटकात अधुनमधून कानावर पडत राहायची. ’छिन्न’ हे नाटक पहाताना मानवी नातेसंबंधातल्या एका विचित्र कंगोर्‍याचा आधीच जो धक्का बसलेला असायचा त्यात त्या नाटकातल्या कवितेची ही खोल खोल ओळ थिएटरमधलं वातावरण आरपार चिरत जायची. ’छिन्न’ पहाताना मन खरोखरच सुन्न व्हायचं.

वामन तावडेंचं हे नाटक तेव्हा मानवी नात्यातल्या एका धाडसी विषयाला हात घालणारं होतंच, पण 1975 नंतर वास्तववादी नाटकांचा जो काळ आला होता त्याला एक निराळं वळण देणारंही होतं. आधी राज्य नाट्यस्पर्धेत ह्या नाटकाचा बोलभाला झाल्यानंतर ते व्यावसायिक रंगमंचावर आलं आणि त्या काळात मान्यवर नाटकवाल्यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. जावई आणि सासू ह्यांच्यातले लैंगिक संबंध उघड झाल्यावर या नाटकात मुलीने आईला ’झाला? शृंगार झाला?’ असं थेट विचारणं तेव्हा अंगावर आल्यावाचूून आणि नखशिखांत शहारून टाकल्याशिवाय राहायचं नाही.

वामन तावडेंचं नाव तोपर्यंत नाटकवाल्यांच्या परिघात पोहोचलं होतं, पण ’छिन्न’मुळे ते सर्वतोमुखी झालं. त्याआधी त्यांनी लिहिलेल्या ’कन्स्ट्रक्शन’, ’पिदी’, ’मी घोडा हुसेनच्या चित्रातला’, ’रायाची रापी’ ह्या एकांकिका निरनिराळ्या स्पर्धांमधून नावाजल्या गेल्या होत्या. ’कन्स्ट्रक्शन’मधून त्यांनी बांधकाम सुरू असलेल्या मजुरांच्या जीवनातली व्यथावेदना वेशीवर आणली होती. वामन तावडे कामगारवर्गातून पुढे आल्यामुळे श्रमिकांचे, कष्टकर्‍यांचे प्रश्न त्यांच्या एकांकिकांतून मांडले जायचे.

पुढे रज्जू, चौकोन, इमला, तुम्हीआम्ही, कॅम्पस ह्यासारखी त्यांची नाटकं आली. त्यांच्या प्रत्येक नाटकात एक वेगळा विषय पराकोटीच्या वेगळ्या धाग्यात गुंफलेला असायचा. शेवटपर्यंत नाटक लिहिण्याचा ध्यास त्यांनी सोडलेला नव्हता. वयाच्या 69व्या वर्षी आलेल्या मुत्यूच्या आधीही ते एक नाटक पूर्ण करण्याच्या बेतात होते आणि आपल्या काही निकटच्या मित्रांना हे आपलं शेवटचं नाटक असल्याचं सांगत होते. पण नियतीच्या मनात त्यांच्याबाबतीत काही अघटित होतं हे आता स्विकारायलाच हवं.

पण आतबाहेर स्वच्छ, सरळ आणि पारदर्शी असलेला वामन तावडेंसारखा नाटककार कायम स्मरणात राहील हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -