घरफिचर्ससंपादकीय - ममतांचा थयथयाट

संपादकीय – ममतांचा थयथयाट

Subscribe

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांचे पाच टप्पे संपलेले आहेत. शेवटचे दोन टप्पे तितके बाकी आहेत. या पाच टप्प्यांच्या निवडणुकीत सर्वाधिक हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये नोंदवला गेला आहे. उमेदवाराला मारणे, मतदारांना मतदान केेंद्रात जाण्यापासून मज्जाव करणे, असे प्रकार सर्रास होत आहेत. मात्र त्यावर बवाल होत नाही. सगळीकडे चडीचूप. एखाद-दुसरी बातमी सोडली तर त्यावर बोलायलाही कोणी धजावत नाही. हेच प्रकार जर भाजपची सत्ता असलेल्या राज्यात घडले असते तर एव्हाना गजहब माजला असता, किंबहुना तो माजवला असता.

पण ममता बॅनर्जी पडल्या सेक्युलर, त्यामुळे सेक्युलरांच्याविरोधात कसे बोलणार? असो, पण मुद्दा तो नाही. प. बंगालमध्ये डाव्यांची सत्ता कोसळल्यावर तेथे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची सत्ता प्रस्थापित झाली. सध्या म्हणजे बंगालमध्ये ममता बानर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्यापासून जे काही चालले आहे, त्याला अराजक यापेक्षा वेगळा शब्द वापरता येत नाही. अर्थात तसे ममतांना वाटत नाही, की त्यांच्या समर्थकांना आणि देशातील तमाम सेक्युलरांना कधी दिसत नाही.

- Advertisement -

2014 सालात देशात सत्तांतर होऊन मोदी पंतप्रधान झाल्यापासून ममतांना देशाचे नेतृत्व करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत आणि त्यासाठी त्या मोदी विरोधात काहीही करण्यासाठी वाटेल त्या थराला जात आहेत. कुठलीही टोकाची भूमिका घेऊ लागल्या आहेत आणि त्यात मग रोहिंग्या मुस्लिमांना आश्रय देण्यापासून बांगला घुसखोरांना पाठीशी घालण्यापर्यंत वाटेल त्या कसरती त्यांच्या सुरू आहेत. पण त्याच त्यांना क्रमाक्रमाने राजकारणातून उठवणार्‍या ठरू लागल्या आहेत. त्याची पहिली सुरूवात त्रिपुरात झाली. भाजपाने मागल्या काही वर्षात त्रिपुरातील बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीला विरोध असल्याच्या धारणेला हातभार लावून, आपले हातपाय तिथे पसरले होते. तर मुळात त्याच धारणेने तृणमूलकडे आलेले त्रिपुरावासी भाजपाकडे आकर्षित होऊ लागले होते.

कारण बंगालची सत्ता हाती आल्यापासून ममतांनी बांगलादेशी घुसखोरांचे लांगुलचालन सुरू केले होते. सहाजिकच अशा त्रिपुरावासी नागरिकांची तृणमूलमध्ये घुसमट चालू होती. कारण तिथले डावेही स्थानिकांच्या भावना पायदळी तुडवून घुसखोरांच्या व्होटबँका बनवण्यात गर्क होते. तेच ममताचे होऊ लागल्यामुळे तृणमूलचे कार्यकर्ते नेते भाजपाकडे वळत गेले आणि एकेदिवशी त्यांनी तृणमूल पक्ष सगळाच्या सगळा भाजपात विलीन करून टाकला. लौकरच तिथल्या काँग्रेसचे सगळे आमदार व पक्षही भाजपात सामील होऊन गेला. अशा रितीने त्रिपुरा राज्यात नामोनिशाण नसलेला भाजपा थेट सत्तेवर येऊन बसला. डाव्यांपासून काँग्रेस आणि तृणमूल घुसखोरांचे समर्थन करणार असतील, तर त्यांच्या नादाला लागून आपली ओळख व अस्मिता पुसून टाकण्यापेक्षा लोकांनी भाजपाची कास धरलेली होती. आता त्याचीच बंगाल व आसाममध्ये पुनरावृत्ती होते आहे. आज बंगालमध्ये भाजपचे बळ वाढताना दिसते आहे, त्याचे श्रेय म्हणूनच अमित शहांपेक्षाही ममतांनाच द्यावे लागेल.

- Advertisement -

मध्यंतरी ममतांनी भाजपा व संघाच्या विरोधात टोकाची भूमिका घेताना बंगालमध्ये हिंदूंना जगणेही अवघड करून टाकले होते. त्यातूनच मागल्या दोन वर्षात तिथे हिंदू लोकसंख्येत भाजपाचे प्रस्थ वाढत गेले आहे. त्यातच आता आसामच्या प्रश्नावर बाकीचे आसामी एकत्र येत असताना, ममतांनी पुन्हा बांगलादेशी घुसखोरांच्या संरक्षणासाठी घेतलेला पवित्रा त्यांना फक्त आसाम नव्हेतर बंगालमध्येही महागात पडणार आहे. कारण आज बंगालमध्ये भाजपाने जी भूमिका घेतलेली आहे, ती मुळात तृणमूल व ममतांची 2005 सालातली भूमिका आहे. याच ‘मा, माटी, मानुष’ भूमिकेने ममतांना सत्तेपर्यंत आणून ठेवले होते. पण आपला हक्काचा मतदारच ममतांनी भाजपाकडे पळवून लावण्याचा चंग बांधला असेल, तर अमित शहांनी त्याला दरवाजे बंद करावेत, अशी कोणाची अपेक्षा आहे काय? असे घुसखोर आपल्याला पुन्हा सत्ता व बहूमत मिळवून देतील, ही ममतांची अपेक्षा फोल ठरणार आहे. कारण त्यातच आसाम काँग्रेसने गमावला आहे आणि त्याच कारणाने डाव्यांना त्रिपुरातून पराभूत व्हावे लागलेले आहे. मग ममता असा आपल्याच पायावर धोंडा कशाला पाडून घेत आहेत? त्या प्रश्नाचे कुठलेही तार्किक उत्तर मिळत नाही.

आपला मतदार आपल्या हातून निघून गेलाय याची ममतांना जाण आहे. त्यामुळे त्यांच्यातील आक्रमकपणा अधिकच वाढत आहे. सीबीआयने कोलकाताच्या पोलीस आयुक्तांवर चिटफंडप्रकरणी टाकलेली धाड असो की, खुद्द ममता यांचेच खासदार, आमदार या चिटफंड घोटाळ्यात अडकलेले असोत, ममता त्याचा दोष थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना देऊ लागल्या आहेत. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. प. बंगालमधील जनता विशेषत: हिंदू मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळू लागला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सभांना जमलेली गर्दी हे त्याचे द्योतक होते. त्यामुळे हादरलेल्या ममतांना कोणताही संविधानिक मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे मतदारांना मतदान करण्यापासून रोखायचे, भाजपच्या उमेदवारांवर हल्ले करायचे असे गुंडगिरीचे मार्ग ममता बॅनर्जी यांनी हाती घेतले आहेत. पण गुंडगिरी फार दिवस टिकत नाही हे ममतांपेक्षा इतर कोणीही जास्त जाणू शकत नाही.

कारण पश्चिम बंगालमधील डाव्यांची गुंडगिरी मोडून त्या तेथे सत्तेत आल्या आहेत. प्रसंगी त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी डाव्यांशी दोन हात केलेल आहेत. आज तशीच परिस्थिती नेमकी भाजपवर आलेली आहे. भाजपचे प. बंगालमधील नेते आणि कार्यकर्ते ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी मोडून काढत आहेत. अर्थात हा पश्चिम बंगालमधील ममतांच्या सिंहासनाला लागलेल्या मोठ्या धक्क्याचा परिणाम आहे. मतदारांना मतदानापासून रोखण्याचा राग पुन्हा मतदार, मोठ्या प्रमाणात मतदान करून काढत आहे. सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये झाले हा त्याचा परिणाम आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -