घरमुंबईभिवंडीत भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या युरिया खताच्या साठ्यावर पोलिसांची धाड

भिवंडीत भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या युरिया खताच्या साठ्यावर पोलिसांची धाड

Subscribe

औषध निर्मिती व दूध भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या युरिया खताच्या अवैध साठ्यावर ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी पूर्णा येथील विमल कंपाऊंडमध्ये असलेल्या साई श्रद्धा एजंसी या गोदामावर छापा टाकून ७ टन युरिया खत जप्त करून गोदाम व्यवस्थापकासह तिघांना अटक केली आहे. विलास दगडू पाटील (वय ४०, रा. टावरे बिल्डिंग, पुर्णा ), ट्र्क चालक जावेद हुसेनसाब मुल्ला (वय ४४, रा. न्यू वंतापुरी, बेळगांव), क्लिनर रमजान मुन्ना मुल्ला (वय २४), असे अवैध युरिया खत प्रकरणी अटक केलेल्या इसमांची नावे आहेत. या तिघांनाही सोमवारी भिवंडीत न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या युरिया भेसळ रॅकेटमध्ये अमोल पवार, किशोर भाई आदींसह गोदाम मालक, चालक, खत उत्पादक, साठवणूक करणारा व पुरवठादार आदींचा देखील समावेश असल्याने या सर्वांना लवकरच अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण 

भिवंडीत पुर्णा येथील गोदामात औषध निर्मिती व दूध भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या युरिया खताचा अवैध साठा केला जात असल्याची खबर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाल्याने रविवारी सायंकाळी पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला असता कर्नाटक येथून युरिया खत भरून आलेल्या ट्रकमधून गोदामात खताच्या गोणी खाली करत असल्याचे दिसून आले. यावेळी गोदाम व्यवस्थापक विलास पाटील याच्याकडे युरिया खत साठा परवान्याची चौकशी केली असता ते त्याच्याकडे नसल्याचे उघड झाले तर खतांच्या गोणींवर कोणताही बॅच अथवा निर्मिती तारीख देखील छापलेली नाही. त्यामुळे हे युरिया खत शेतकऱ्यांना पुरवठा न करता ते अन्यत्र भेसळीसाठी साठवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अवैध युरिया खत साठ्याप्रकरणी खत नियंत्रण आदेश १९८५ अन्वये खंड २५ (१), (२), (३) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम ३ व ७ आणि भादंवि. कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून ट्रकसह युरीया खताच्या ७ टन वजनाच्या १५१ गोणी जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय के. आर. पाटील करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -