घरमुंबईडम्पिंग ग्राऊंडचा प्रकल्प लादल्यास हाणून पाडू

डम्पिंग ग्राऊंडचा प्रकल्प लादल्यास हाणून पाडू

Subscribe

जनसुनावणीत दर्शविला तीव्र विरोध!

टिटवाळाजवळील मांडा परिसरात दीडशे मेट्रीक टन क्षमतेचे डम्पिंग ग्राऊंड उभारण्यात येणार असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत बुधवारी जनसुनावणी घेण्यात आली. मात्र डम्पिंग ग्राऊंडला मांडा टिटवाळावासियांनी तीव्र विरोध दर्शविला. आम्हाला तुमचे काहीएक ऐकायचे नाही. आमचे म्हणणे सरकारपर्यंत पोहचवा, जर विरोध डावलून डम्पिंग ग्राऊंड उभारण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू, असा इशारा मांडा-टिटवाळावासीयांनी यावेळी दिला.

मांडा येथील संगोडा रस्त्याजवळील मलशुद्धीकरण केंद्रानजीक १५० मेट्रिक टन क्षमतेचा डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प (एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प) उभारण्यात येणार आहे. मांडा येथील विद्या मंदिर हायस्कूल शाळेत याची जनसुनावणी पार पडली. जनसुनावणीस मांडा-टिटवाळा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने ही जनसुनावणी शाळेच्या प्रांगणात घेण्यात आली. डम्पिंग ग्राऊंडच्या प्रकल्पाची माहिती देऊन त्यासंबंधित चित्रफीत दाखविण्यात येणार होती, मात्र आम्हाला तुमचे काही ऐकायचे नाही, आमचे म्हणणे ऐकून घेऊन ते शासनापर्यंत पोहोचवा, असा आग्रह नागरिकांनी धरला.

- Advertisement -

केडीएमसीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी सदर प्रकल्पाला विरोध करताना सांगितले की, नागरी वस्तीपासून अवघ्या ५०-१०० मीटरवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. हा परिसर सखल भाग असल्याने प्रतिवर्षी तेथे पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. तेथे पुरेसा बफर झोन ठेवण्यात आलेला नाही. परिसरातील पारंपारिक व्यवसायावर या प्रकल्पाचा परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

अ‍ॅड. जयेश वाणी यांनी डम्पिंग ग्राऊंड उभारण्यात येणारा भाग भूकंप प्रवण क्षेत्र परिसर असल्याचे यापूर्वीच केंद्राच्या एका समितीने जाहीर केले होते. अशा ठिकाणी हा प्रकल्प करता येऊ शकतो का, असा सवाल केला. २६ जुलै २००५ ला आलेल्या पुरात हा भागही पाण्याखाली गेल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. बारावे येथील डम्पिंग ग्राऊंडला स्थानिकांचा विरोध असतानाही तो प्रकल्प उभारण्यात आला, मात्र मांडा येथे हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता. या जनसुनावणीस अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, उपविभागीय अधिकारी नितीन महाजन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील, उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त धनाजी तोरस्कर आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -