घरमुंबईपीएमसीचा फटका बँक ऑफ महाराष्ट्रला!

पीएमसीचा फटका बँक ऑफ महाराष्ट्रला!

Subscribe

रिझर्व्ह बँकेने पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध घातल्याचा फटका राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रला बसला आहे. बँकेच्या खातेदारांनी येथील, तसेच दिघी व बागमांडला शाखेतून गेल्या चार दिवसांत जवळ-जवळ दीड कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या आहेत. परिणामी या शाखांच्या प्रमुखांना ठेवीदारांची समजूत काढताना नाकी नऊ येत आहेत. याचे पडसाद मुंबईतही दिसून आले असून मुंबईतही अनेक खातेदारांनी सध्या बँकेमधील आपल्या ठेवी काढून घेतल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी व्हॉटस अ‍ॅपवर नऊ बँक बंध होणार असल्याचे वृत्त वार्‍यासारखं पसरले होते. त्यामुळेच बँक ऑफ महाराष्ट्राच्या खोतदारांनी आपल्या ठेवी काढून घेण्यास सुरुवात केल्याची माहिती पुढे आली आहे.

अलिकडे आर्थिक घोटाळ्यांमुळे अनेक बँका, पतसंस्था डबघाईला आलेल्या असताना पीएमसीच्या व्यवहारांवर मर्यादा आणल्यामुळे या बँकेसह अन्य बँकांचेही ठेवीदार हादरले आहेत. त्यातूनच उलटसुलट चर्चा सुरू झाल्यामुळे ठेवीदारांच्या गोंधळात अधिकच भर पडत आहे. बँकेत ठेवच नको, अशा मानसिकतेपर्यंत अनेक ग्राहक आले आहेत. स्वाभाविक त्याचा थेट फटका बँक ऑफ महाराष्ट्रला बसत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचा पीएमसीशी कोणताही संबंध नसताना काहीशा नामसाधर्म्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांचा गोंधळ झाला आहे. सध्या उपरोक्त शाखांतून रकमा काढण्यासाठी ठेवीदारांची गर्दी वाढत आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी तेथील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना कसरत करावी लागत आहे.

- Advertisement -

व्हॉट्स अ‍ॅप मेसेजने केला घात
दरम्यान, मुंबईतही अशाप्रकारच्या घटना वाढल्या असल्याची माहिती बँकेच्या कर्मचार्‍यांकडून देण्यात आली आहे. पीएमसी बँकेच्या घटनेनंतर बँकेतील अनेक खातेदारांनी बँकेत गर्दी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यात अनेकांकडून मोठी रक्कम काढली जात आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात चौकशी केली असता अनेकांनी व्हॉट्स अ‍ॅपवर मॅसेज आल्याचे कारण पुढे केल्याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी नऊ बँक बंद होणार असल्याचा मॅसेज व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाला होता. त्यात बँक ऑफ महाराष्ट्राचे देखील नाव होते. त्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याने अनेक खातेदारांनी सध्या पैसे काढण्याची घाई केली आहे. यासंदर्भात अनेक बँक व्यवस्थापकांकडून खातेदारांना समजविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती यावेळी मुंबईतील बँक ऑफ महाराष्ट्रातील कर्मचार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर आपलं महानगरला दिली.

पीएमसीचा बँक ऑफ महाराष्ट्रशी काहीही संबंध नाही, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही प्रकारे इतर बँकेमध्ये विलीन होणार नसल्याने ग्राहकांनी बँकेबाबत पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. ठेवीदारांच्या विविध खात्यांतील रकमा सुरक्षित असून, ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कोणतेच कारण नाही.
-जतीन हैलकर, व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, बोर्ली पंचतन शाखा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -