घरमुंबईरेल्वे कंत्राटदाराने खोदलेला खड्डा ठरला मृत्यूचा सापळा

रेल्वे कंत्राटदाराने खोदलेला खड्डा ठरला मृत्यूचा सापळा

Subscribe

सोमवारच्या मुसळधार पावसामुळे सर्व खड्डे जलमय झाले होते. मात्र कंत्राटदाराकडून काम करताना कोणतीही सुरक्षितता न बाळगल्याने लहानग्या विजयला जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत.

कळवा रेल्वे स्थानकाशेजारील असलेल्या एका खड्ड्यात बुडून विजय पवार या आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या वस्तीच्या जवळच नवीन रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू असून त्या कामासाठीच रेल्वेच्या कंत्राटदाराकडून खड्डे खोदण्यात आले होते. सोमवारच्या मुसळधार पावसामुळे सर्व खड्डे जलमय झाले होते. मात्र कंत्राटदाराकडून काम करताना कोणतीही सुरक्षितता न बाळगल्याने लहानग्या विजयला जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत. विजयच्या मृत्यूनंतर १२ ते १४ तास उलटल्यानंतरही रेल्वे प्रशासनाचा अथवा कंत्राटदाराचा एकही अधिकारी तिथे फिरकलेला नाही. त्या परिसरातीलन खोदलेले खड्डे, उघडी गटारे जीवघेणी ठरत असल्याने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

VIJAY PAVAR MRUT
मृत आठ वर्षीय विजय पवार

पाय घसरल्याने तो पाण्यात पडून वाहून गेला

कळवा रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील बाजूस सम्राट अशोकनगर वस्ती आहे. या वस्तीच्या शेजारी नवीन रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी रेल्वे कंत्राटदाराकडून गटारासाठी खोदकाम केले आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास या वस्तीत राहणारा विजय हा शौचास जाण्यासाठी बाहेर पडला होता. जोरदार पावसामुळे इथला परिसर संपूर्णपणे जलमय झाला होता. याचवेळी विजयचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडून वाहून गेला. हा प्रकार लहान मुलांनी पाहिल्यानंतर विजय पाण्यात बुडाल्याचे त्यांनी वस्तीत येऊन सांगितले. यावेळी आकाश राठोड,राकेश राठोड, गोविंद राठोड, कुणाल चव्हाण, तात्या या वस्तीतील मुलांनी शोधाशोध सुरू केली. मात्र तीन ते चार तासानंतर विजयचा मृतदेह सापडला. एका नाल्यात मृतदेह अडकून पडला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. विजयच्या आठवणीने त्याचे वडील किसन आणि आई केसीबाय ढसाढसा रडत आहेत. किसन आणि केसीबाय हे नाका कामगार आहेत. त्यामुळे मुलांना घरी ठेवून ते नाक्यावर कामाला गेले होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असून विजय हा सर्वात लहान मुलगा होता. तो महापालिकेच्या शाळेत दुसरीत शिकत होता.

- Advertisement -

कंत्राटदाराकडून कोणतीच काळजी नाही

विजयच्या मत्यूनंतर रेल्वे प्रशासनाचा एकही अधिकारी अथवा कंत्राटदाराचा व्यक्ती त्या ठिकाणी फिरकलेला नाही. कंत्राटदाराकडून त्यांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. असे वस्तीतील रहिवाशांनी सांगितले. तीन ते चार महिन्यांपासून कंत्राटदाराने या परिसरात खोदकाम करून ठेवले. सुरक्षिततेच्या दृष्टीने कंत्राटदाराकडून कोणतीच काळजी घेतलेली नाही. घराशेजारी गटारेही उघडी असून त्यावर झाकणे नाहीत, असे रहिवाशांनी सांगितले.

शौचालये नाहीत…करायचे काय?

अशोक सम्राट नगर परिसरात साधारण बाराशे लोकवस्ती आहे. मात्र या वस्तीसाठी अवघे सहा सीट्सचे शौचालय बांधण्यात आले आहे, इतक्या मोठ्या लोकवस्तीसाठी हे शौचालय अपुरे पडत आहेत. सकाळच्यावेळी शौचालयासाठी लांबच लांब रांग लागलेली असते. त्यामुळे पुरूष मंडळी व लहान मुलांना नाईलाजास्तव उघड्यावर जावे लागते. शौचालयात नळाची सुविधा नाही तसेच साफ सफाई केली जात नाही. शेजारीच असलेल्या गोपाळनगरभागात तीन मजली शौचालय बांधण्यात आले. मात्र हजारोंच्या लोकवस्तीसाठी केवळ सहा शौचालये आहेत. उघड्यावर शौचाला गेल्यानंतर पालिकेकडून अनेकवेळा दंडही केला गेला. मात्र अपुऱ्या शौचालयांमुळे करणार काय ? असा सवालही रहिवाशांनी केला.

- Advertisement -

गोरगरीबांच्या वस्त्यांतील मृत्यूचे सापळे

या भागातील मुलांना खेळायला मैदान नाही, त्यामुळे मुले मोकळ्या जागेत खेळतात. मात्र त्याठिकाणी रेल्वेचे काम सुरू असल्याने मोठ-मोठ खड्डे खोदून ठेवले आहेत. घराशेजारील असलेली गटारे उघडी आहेत. त्यावर झाकणे नाहीत. कळवा रेल्वे स्टेशनबाजूला असलेल्या तलावाजवळ पूर्व व पश्चिमेला जाण्यासाठी रेल्वेने ब्रीज बांधला. मात्र त्या ब्रीजवरून कोणीही जात नाही. ब्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात घाण व कचरा साठलेला असतो. त्यामुळे बहुसंख्य पालक मुलांना रूळ क्रॉसिंग करूनच घेऊनच पलिकडे जातात.

तरीही विजय सोडून गेला…

विजय हा काही दिवसांपासून आजारी होता. घरची परिस्थिती हालाखीची. पालकांना कामगार म्हणून नाक्यावर गेल्यानंतर हाताला काम मिळले की नाही हे माहित नाही. पण मुलाच्या उपचारासाठी त्यांनी पैशाची कमी पडू दिली नाही. काही दिवसांपूर्वीच विजयच्या उपचारासाठी वडीलांनी दीड लाख रूपये कर्ज काढून त्याच्यावर उपचार करून त्याला बरे केले होते. विजय ठणठणीत झाला होता. पण सोमवारी जोरदार पावसात खड्डयात पडून विजयला जीव गमवावा लागला. अखेर विजय सर्वांनाच सोडून गेला त्याची खूपच आठवण येते असे, स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -