घरमुंबईनॅक मूल्यांकनासाठी रिक्त पदभरतीची धडपड

नॅक मूल्यांकनासाठी रिक्त पदभरतीची धडपड

Subscribe

प्रभारी कारभारामुळे विद्यापीठाच्या कामावर परिणाम

विद्यापीठातील बहुतांश विभागातील जबाबदारी ही प्रभारी अधिकार्‍यांवर आहे. पदभरतीकडे वारंवार दुर्लक्ष करणार्‍या विद्यापीठ प्रशासनाचा हा गलथानपणा आता नॅक मूल्यांकन मिळवण्यासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठातील बहुतांश सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. यासाठी प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

मुंबई विद्यापीठातील बहुतांश विभागांना प्रमुख नसल्याने अनेक अधिकार्‍यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याचा फटका विद्यापीठाच्या कारभाराला बसत आहे. कारभार संथगतीने चालत असल्याने यामध्ये विद्यार्थीही भरडले जात आहेत. विद्यापीठाशी संलग्न असलेले दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या संचालकपदी डॉ. कविता लघाटे यांची पूर्णवेळ नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे विद्यापीठाच्या जमनालाल बजाज व्यवस्थापन या महत्वाच्या संस्थेचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे सध्या लघाटे यांना दोन्ही संस्थांचा कारभार सांभाळावा लागत आहे.

- Advertisement -

तसेच रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख असलेल्या शिवराम गर्जे यांच्याकडे कलिना संकुलातील गरवारे व्यवस्थापन शिक्षण व विकास संस्थेच्या संचालकपदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे. नॅनो विभागालाही पूर्णवेळ विभाग प्रमुख नाहीत. ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस या विभागासाठी विद्यापीठाबाहेरील व्यक्ती योगेश सोमण यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महिला विकास कक्षाच्या प्रमुखपदी गीता चड्डा यांची नेमणूक केली आहे. हे पद वरिष्ठ श्रेणीतील असताना त्यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे.

विद्यापीठातील या प्रमुख पदांचा कारभार प्रभारी असल्याने प्रशासकीय कामांचा खोळंबा होत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. विद्यापीठाला नॅक मूल्यांकन मिळवण्यासाठी सध्या कुलगुरूंकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नॅक मूल्यांकनासाठी प्रत्येक विभागाला विभाग प्रमुख असण्याबरोबरच नियमानुसार कर्मचारी असणेही गरजेचे आहे. त्यामुळे अधिकार्‍यांची पदे भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने धावपळ सुरू केली आहे. नॅकची समिती दोन महिन्यामध्ये विद्यापीठाची पाहणी करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वी ही पदे भरण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

विद्यापीठाच्या विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार येणार्‍या अर्जांची छाननी करून पात्र व्यक्तींची निवड करण्यात येईल.
– डॉ. अजय देशमुख, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -