घरमुंबईBMC : रिलायन्स आणि लोखंडवालाचे नाव मोठे लक्षण खोटे; पालिकेचा कोट्यवधींचा कर...

BMC : रिलायन्स आणि लोखंडवालाचे नाव मोठे लक्षण खोटे; पालिकेचा कोट्यवधींचा कर थकवला

Subscribe

मुंबई महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांमध्ये रिलायन्स कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, लोखंडवाला बिल्डर, कमला मिल्स लिमिटेड यांसारखे बडे बिल्डर, कंपन्या, उद्योगपती आदींची नावे समोर आली आहेत.

मुंबई : मुंबई महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांमध्ये रिलायन्स कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, लोखंडवाला बिल्डर, कमला मिल्स लिमिटेड यांसारखे बडे बिल्डर, कंपन्या, उद्योगपती आदींची नावे समोर आली आहेत. त्यांनी महापालिकेचा किमान दोन कोटी व त्यापेक्षाही अधिक मालमत्ता कर थकविला आहे. त्यामुळे या नामांकित बिल्डर, कंपन्या, उद्योगपती यांचे ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशी गत असल्याची टीका समाज माध्यमात होत आहे. (Reliance and Lokhandwala owe the Mumbai Municipal Corporation crores in taxes)

मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मोठे स्त्रोत म्हणून मालमत्ता कर वसुली याकडे पाहिले जाते. मुंबई महापालिकेला जागांचे वाढते भाव, वाढते शहरीकरण पाहता मालमत्ता कर जास्तीत जास्त मिळणे अपेक्षित असते. सन 2022-23 या आर्थिक वर्षात महापालिकेला अंदाजे सहा हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र महापालिकेने केलेल्या ठरावानुसार, 500 चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. तसेच, कर निर्धारण व संकलन खात्याने फेब्रुवारी महिन्यात उशिराने बिल काढल्याने 31 मार्चपर्यंत महापालिका तिजोरीत 4,500 कोटी रुपयांपैकी 3,195 कोटी 91 लाख 11 हजार रुपये जमा झाले. उर्वरित 1,305 कोटी रुपये कर वसुली करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी पालिकेने कर थकबाकीदारांना 25 मे पर्यंत मुदत वाठवून दिली आहे. मात्र अद्यापही, रिलायन्स कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, लोखंडवाला बिल्डर, कमला मिल्स लिमिटेड यांसारखे बडे बिल्डर, कंपन्या , उद्योगपती आदींकडे 1,200 कोटी रुपये पेक्षाही जास्त कर थकबाकी प्रलंबित आहे.

- Advertisement -

पालिकेने आता मालमत्ता करभरणा करण्यासाठी 25 मे पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. मात्र मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करता यावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्यावतीने वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही विभाग (वॉर्ड) कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आले आहेत. तसेच यासंबंधीत अडचणींचा निपटारा करण्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी अविरत कार्यरत आहेत. तथापि, अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करून दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

‘टॉप टेन’ थकबाकीदारांची नावे

  1. सिद्दीक एम. आफिजी (आर/उत्तर विभाग) – 2 कोटी 27 लाख 94 हजार 71 रुपये
  2. कमला मिल्स लिमिटेड (जी/दक्षिण विभाग) – 2 कोटी 24 लाख 5 हजार 708 रुपये
  3. ओम ओमेगा शेल्टर्स (जी/दक्षिण विभाग) – 2 कोटी 23 लाख 11 हजार 970 रुपये
  4. श्री समर्थ स्पार्क डेव्हलपर्स (टी विभाग) – 2 कोटी 14 लाख 6 हजार 786 रुपये
  5. ट्रान्सकॉन शेठ क्रिएटर्स प्रा. लि. (पी/उत्तर विभाग) – 2 कोटी 12 लाख 95 हजार 818 रुपये
  6. रिलायन्स कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (जी/दक्षिण विभाग) – 2 कोटी 10 लाख 87 हजार 179 रुपये
  7. श्री गणपत गणरू काटकर (एच/पूर्व विभाग) – 2 कोटी 9 लाख 14 हजार 647 रुपये
  8. पंचशील गृहनिर्माण संस्था (जी/दक्षिण विभाग) – 2 कोटी 7 लाख 47 हजार 444 रुपये
  9. लेझर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लिमिटेड (टी विभाग) – 2 कोटी 4 लाख 15 हजार 956 रुपये
  10. लोखंडवाला बिल्डर्स (जी/दक्षिण विभाग) – 2 कोटी 44 हजार 360 रुपये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -