घरताज्या घडामोडीमुंबई मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई, २५ लाखाचे एलईडी साहित्य जप्त

मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई, २५ लाखाचे एलईडी साहित्य जप्त

Subscribe

राज्यात बेकायदा मासेमारीला प्रतिबंध करणारा अध्यादेश लागू झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी कारवाई

केंद्र आणि राज्य सरकारने बंदी घातलेल्या एलईडी मासेमारी नौकांच्या विरोधात बुधवारी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली. या कारवाईत जवळपास २५ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. राज्यात बेकायदा मासेमारीला प्रतिबंध करणारा अध्यादेश लागू झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

मुंबईतील भाऊचा धक्का येथील समुद्रापासून जवळपास सात ते आठ नॉटीकल मैल अंतरावर बेकायदा मासेमारी सुरु असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाच्या मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांना मिळाली होती. त्यानुसार विभागाने बुधवारी रात्री बेकायदा मासेमारी करणाऱ्या सात नौकांना ताब्यात घेऊन कारवाई केली. या कारवाईवेळी साई गोल्ड, दयाळू माता आणि अंबा या तीन नौकांवर एलईडी साहित्य आढळून आले. तर उर्वरित चार नौकांमध्ये पर्ससीन जाळ्या आढळून आल्या. पथकाने यावेळी २५ लाख रुपयांचे साहित्य जप्त केले.

- Advertisement -

महेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी संजय माने, सहाय्यक अधिकारी सचिन भालेराव, नीरज चास्कर आदींनी ही कारवाई केली. राज्यात महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन सुधारणा अध्यादेश लागू झाल्यानंतरची ही पहिलीच कारवाई आहे. या अध्यादेशात एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांना पाच लाख रुपये तर पर्ससीन जाळी वापरणाऱ्या नौकांवर एक लाख रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे, अशी माहिती महेश देवरे यांनी दिली.


हेही वाचा –  मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या वाढवण्याच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -