जबरदस्तीने कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, वाझेचा NIA विरोधात सनसनाटी आरोप

sachin vaze nia

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सध्या न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाकडून चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यातील एक तासाची चर्चा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यापाठोपाठच आज मंगळवारीही अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात बंद दालनात भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. पण आजच्या आयोगाच्या चौकशी दरम्यान एक खळबळजनक दावा सचिन वाझेने केला आहे. नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) संदर्भातील हा दावा आहे. सचिन वाझेने एनआयएवर आरोप करतानाच आपल्याला झालेल्या मानसिक आणि शारिरीक त्रासाबाबतचा उल्लेख केला आहे.

एंटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येच्या आरोपामध्ये सचिन वाझेला एनआयएने अटक केली होती. त्यानंतर सचिन वाझेची रवानगी ही तळोजा कारागृहात करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच गोरेगाव खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझेची कस्टडी घेतली होती. अटक झाल्यानंतरचे दिवस कसे होते ? अशी विचारणा सचिन वाझेला केल्यानंतर माझा शारिरीक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप सचिन वाझेने केला. कोठडीत असताना रोजच्या चौकशी दरम्यान प्रचंड मानसिक आणि शारिरीक ताण असायचा. ज्याचे माझ्यावर परिणाम आजही कायम आहेत असेही वाझेने सांगितले. शिवाय अधिकाऱ्यांनी माझ्याकडून अनेक जबरदस्तीने कागदपत्रावर सह्यादेखील घेतल्याचा आरोप वाझेने केला आहे.

आज परमबीर सिंह, सचिन वाझे आणि अनिल देशमुख या तिघांची चौकशी चांदीवाल आयोगापुढे झाली. चौकशीच्या वेळी अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सचिन वाझेंना परमबीर सिंह यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांबाबतचे कोणते पुरावे आहेत का ? अशी विचारणा केली. त्यानंतर वाझेने माझ्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले आहे. याआधीच परमबीर सिंह यांनीही आपल्याकडे सादर करण्यासाठी आणखी पुरावे नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वाझेवरील ताण पाहता आयोगाच आजचे कामकाज संपले. सचिन वाझेची उलटतपासणी उद्या बुधवारीही होणार आहे. आज अनिल देशमुख यांना प्रॉडक्शन वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानुसार अनिल देशमुख आज आयोगासमोर हजर झाले. अनिल देशमुखांचे कुटुंबीय सुनावणीच्या वेळी हजर होते. कोर्टाने देशमुखांना कुटूंबीयांशी भेटण्याची संधी दिली.

आयोगाने व्यक्त केली नाराजी

आज मंगळवारी चांदीवाल आयोगासमोर परमबीर सिंह हे पुन्हा हजर झाले. यावेळी मुंबई पोलिसांच्या कामावर आयोगाने नाराजी व्यक्त केली. सचिन वाझेला घेऊन येणाऱ्या पोलिसांना आयोगाने आज खडसावले. कोर्टाबाहेर जे घडेल त्याची जबाबदारी पोलिसांची असेल असेही न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सांगितले.

सोमवारी परमबीर सिंह आणि वाझे भेटीनंतर आज अनिल देशमुख आणि वाझे हे एकाच दालनात आल्याची माहिती समोर आली. हे दोघेही एकाच खोलीमध्ये दहा मिनिटे असल्याची माहिती आली. अनिल देशमुखांचे वकील सचिन वाझेंची उलट तपासणी करणार आहेत. पण देशमुखांच्या वकिलांनी अतिरिक्त वेळ मागितल्यानेच कोर्टाचे कामकाज तासाभरासाठी तहकूब झाले. त्यानंतर सचिन वाझे आणि अनिल देशमुख हे एकाच दालनात दहा मिनिटांसाठी भेटल्याची चर्चा आहे. त्यामुळेच काही मिनिटांपूर्वी आयोगाने पोलिसांना झापलेले असतानाच लगेचच या प्रसंगामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोघांमध्ये झालेल्या भेटीच्या चर्चेमुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


आज सचिन वाझे – अनिल देशमुख यांच्यात १० मिनिटे चर्चा, आयोगाने पोलिसांना खडसावले