घरमुंबईखासगी, सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

खासगी, सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

Subscribe

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाकडून मुंबईतील सरकारी व खासगी शाळांच्या इमारतीचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु महापालिकेसह खासगी संस्थांनीही इमारतींचे फायर ऑडिट करण्याचे आदेश धाब्यावर बसवले आहेत. मुंबईतील तब्बल 442 शाळांचे फायर ऑडिट झालेले नाही. 312 शाळांचे ऑडिट अपूर्ण आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात असल्याबाबत नगरसेवकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत संताप व्यक्त केला आहे.

मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडत असतात. अशा वेळी आग प्रतिबंधक उपाययोजना करणे नितांत गरजेचे असते. विशेषत: हॉस्पिटल्स, शाळा-महाविद्यालयांमध्ये याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते, परंतु मुंबईत महापालिका आणि खासगी शाळांची याबाबत उदासीनता दिसून आली. जर मुंबईसारख्या शहरांची अशी विदारक स्थिती असेल तर राज्यभरातील शाळांचीही स्थिती किती दयनीय असेल, याबाबत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

कमला मिलमधील हुक्का पार्लरला डिसेंबर २०१७ मध्ये आग लागली होती. त्यानंतर ठरावाची सूचना मांडून पालिका शाळांचे फायर ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी केली होती. त्यानुसार पालिकेच्या शाळांचे फायर ऑडिट करण्याचे, शाळेतील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचे तसेच विद्यार्थ्यांचे मॉक ड्रिलही करून त्याचे अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, या आदेशाला प्रशासकीय अधिकार्‍यांंनी केराची टोपली दाखवली आहे. मुंबईमध्ये खासगी अनुदानित व विनाअनुदानित अशा ११०३ शाळा आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ २८२ शाळांचे फायर ऑडिट झाले आहे. ३१२ शाळांचे ऑडिट अद्याप अपूर्ण आहे. तर तब्बल ४४२ शाळांचे ऑडिट अद्याप झालेच नसल्याचे शिक्षण समितीच्या बैठकीत उघडकीस आले.

महापालिकेच्या शाळांप्रमाणे खासगी शाळांचे ऑडिट करण्यासाठीही सारखीच प्रक्रिया राबवण्यात आली. पालिकेकडून शाळांना ऑडिट करण्यासंदर्भात परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण व मॉकड्रिल करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. मात्र त्यासाठी येणारा खर्च करण्यास खासगी शाळा तयार नसल्याने त्यांच्या इमारतींचे ऑडिट झाले नसल्याचे यावेळी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी फायर ऑडिटचा मुद्दा उपस्थित करुन प्रशासनाचे कान धरले. हे प्रकरण गंभीर असल्याचे खान यांनी स्पष्ट केले. दरम्यान, समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी प्रशासनाला तातडीने फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनानेही फायर ऑडिट करण्यास समर्थन दर्शवले.

शाळांच्या ऑडिटविषयी माहिती

विभाग       ऑडिट न          अपूर्ण ऑडिट
            झालेल्या शाळा
शहर           137                  73
पश्चिम        163                 135
पूर्व            142                 104
……………………………………………
   442                  312

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -