‘व्हॅक्यूम क्लिनर’ मनमुराद आनंद

 कलावंत म्हटलं की सर्वच प्रकारच्या भूमिका करता यायला हव्यात असे जरी मानले तरी प्रत्येक कलाकाराने आपला आवाका लक्षात घेऊन भूमिका या हाताळलेल्या आहेत. चिन्मय मांडलेकर याचा अभिनय प्रवास लक्षात घेतला तर तो गंभीर, तटस्थ भूमिकांमध्ये अधिक दिसलेला आहे. त्याचा लेखक, दिग्दर्शक म्हणूनही स्वतंत्र असा प्रवास आहे. नाट्यशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास केल्यामुळे ही किमया त्याला प्राप्त झालेली आहे. विनोदी लिखाण आणि दिग्दर्शन आपण करू शकतो याची खात्री देणारं ‘व्हॅक्यूम क्लिनर’ हे नाटक रंगमंचावर दाखल झालेले आहे.

‘व्हॅक्यूम क्लिनर’
‘व्हॅक्यूम क्लिनर’नाटक

चिन्मय मांडलेकर हा अभिनेता म्हणून जेवढा परिचयाचा आहे तेवढाच तो लेखक, दिग्दर्शक म्हणूनही प्रेक्षकांना ज्ञात आहे. मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही क्षेत्रात आपले कसब त्याने दाखवलेले आहे. आता हिंदी मालिकेतही त्याचा प्रभाव दिसायला लागलेला आहे. त्याच्या सर्जनशीलतेचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. नाटकाची निर्मिती करणारी संस्था जशी महत्त्वाची ठरते तसेच त्याचे लेखन, दिग्दर्शन कोण करतो यावरसुद्धा नाटकाची उंची अवलंबून असते. ‘अष्टविनायक’ ही दिलीप जाधव यांची संस्था आहे. आजवर दर्जेदार नाटकांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्याला चिन्मयचे लेखक, दिग्दर्शक या नात्याने सहकार्य लाभलेले आहे. त्यात आणखीन एक जमेची गोष्ट म्हणजे दिलीपबरोबर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी या नाटकाची निर्मिती केलेली आहे. संज्योत वैद्य, श्रीपाद पद्माकर या निर्मात्यांचेसुद्धा आवर्जून नाव घ्यावे लागेल. यांचा सहभाग नाटक उत्तम असल्याची खात्री देणारा असला तरी प्रेक्षक आवर्जून यावेत असे दोन हुकूमाचे कलाकार या नाटकात आहेत. एक अशोक सराफ आणि दुसरा म्हणजे निर्मिती सावंत.

नयना-रंजन हे दोघे पती-पत्नी. प्रियंका, परिक्षीत ही त्यांना दोन मुलं. प्रियांका विवाहबद्ध झालेली आहे. परिक्षीत नृत्याच्या क्षेत्रात करिअर करू पहात आहे. नयना रंजनच्या स्वावलंबी वागण्याला कंटाळलेली आहे. माणसाच्या वागणुकीत, कार्यात पुरुषाचे वर्चस्व दिसायला हवे असे रंजनला वाटत असते. नयना परिक्षीतला परि या नावाने वागणूक देत असल्यामुळे त्याच्यात बाईलपणा आलेला आहे जो पुढे बायल्या म्हणवण्यापर्यंत जाईल असे रंजनला वाटत असते आणि त्यापद्धतीने तो आपल्या मुलाला वागणूक देत असतो. अशा स्थितीत रंजन व्हॅक्यूम क्लिनर हाताळायला जातो आणि त्याला इलेक्ट्रीक शॉक बसतो. नयना त्याला वाचवण्यासाठी जाते. तिलासुद्धा इलेक्ट्रीकच्या शॉकला सामोरे जावे लागते. हा सर्व प्रसंग धक्का देणारा आहे. ब्लॅकआऊट होतो. पुन्हा रंगमंच प्रकाशमान होतो आणि प्रेक्षक चमत्कारिक नजरेने पुढचे नाटक पाहू लागतील अशी गोष्ट या दोघांच्या जीवनात घडते. या शॉकच्या झटक्याने नयना रंजनच्या देहात प्रवेश करते आणि रंजन नयनासारखा वागू लागतो. कपडे जरी तेच असले तरी या दोघांची आंतरिक रचना पूर्णपणे बदलते. रंजन स्त्रीसारखा वागू लागतो तर नयना पुरुषासारखी कथासूत्रात वावरताना दिसते.

एकंदरीत काय तर नाटक विनोदी आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. कथाच मुळात उत्तम आहे म्हटल्यानंतर सातत्याने विनोदी भूमिकेसाठी तत्पर असणार्‍या दोन विनोदवीरांनी या कथेला आपल्या पद्धतीने न्याय दिला आहे. परिवर्तन झालेल्या शरीरांचे नंतर काय होते यासाठी हे नाटक तुम्हाला केवळ मनमुराद आनंदासाठी आणि खळखळून हसण्यासाठी एकदातरी पहावे लागेल. नयनाची व्यक्तिरेखा निर्मिती सावंत तर रंजनची व्यक्तिरेखा अशोक सराफ यांनी केलेली आहे. चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांनी एकत्रितपणे अनेक चित्रपटांत काम केलेले आहे. प्रसंग उत्तम रंगवण्यासाठी आणि विनोदातला अचूक टायमिंग साधण्यासाठी प्रथम मनाने सजग असायला हवे ही गुणवत्ता या दोन्ही कलाकारांकडे आहे. प्रत्येक प्रसंगात, संवादात ती योग्य रितीने पेरली गेली आहे. शरीराचे परिवर्तन झाल्यानंतर संवादाबरोबर देहबोलीही तेवढीच महत्त्वाची असते. सराफ यांचा बाईलपणा आणि सावंत यांचा पुरुषीपणा प्रेक्षकांचे छान मनोरंजन करतो. या दोघांशिवाय यात तन्वी पालव, सागर खेडेकर, मोसमी तोंडवळकर यांच्या भूमिका पहायला मिळतात. परिक्षीतच्या व्यक्तिरेखेत दिसलेला प्रथमेश चेऊलकर याने अभिनयाबरोबर नृत्यात दाखवलेला आत्मविश्वास दाद देणारा आहे. प्रदीप मुळे(नेपथ्य), राहुल रानडे(संगीत), रवी-रसिक(प्रकाश योजना), फुलवा खामकर(नृत्य) यांनी नाटक प्रभावी होण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुक करणारे आहेत.

निर्मिती असायलाच हवी
एकदा का निर्मात्याबरोबर एखाद्या कलाकाराची विचारसरणी जुळून आली की बर्‍याचवेळा निर्माते आपल्या निर्मितीत त्याच कलाकारांचा आग्रह धरतात. इतकेच काय तर खास त्यांच्यासाठी तसे नाटकही लिहून घेतले जाते. ‘अष्टविनायक’ ही दिलीप जाधवची नाट्यसंस्था आहे जी गेली अनेक वर्षे निर्मितीच्या क्षेत्रात आहे. गेल्या दोन दशकातील त्यांच्या नाटकांची निर्मिती लक्षात घेतली तर बर्‍याचशा नाटकात अभिनेत्री निर्मिती सावंत हिचा कलाकार म्हणून सहभाग होईल असे त्यांनी पाहिलेले आहे. श्री बाई समर्थ, कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रीक, शामची मम्मी, जाऊबाई जोरात इतकेच काय तर ही पोरगी कोणाची, निशाणी डावा अंगठा या अष्टविनायक निर्मित चित्रपटातही निर्मिती सावंत होती. अशा या निर्मितीचा गंगूबाईच्या निमित्ताने नाटक, चित्रपट, मालिका यातील सहभाग हा वेगळा सांगायला नको.