घरमुंबईखार दुहेरी हत्याकांड; बोहल्यावर चढण्यासाठी वृद्ध दाम्पत्याची हत्या

खार दुहेरी हत्याकांड; बोहल्यावर चढण्यासाठी वृद्ध दाम्पत्याची हत्या

Subscribe

वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी मोलकरीण आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली. लग्नासाठी मखिजानी दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासामध्ये उघड झाली आहे.

मुंबई येथील खार या ठिकाणी एका इमारतीमध्ये ज्येष्ठ दाम्पत्याचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. एकता डेलाइट या इमारतीत हे दोन मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी हत्येचा तपास सुरु असून मोलकरीण आणि तिच्या पतीला आज अटक करण्यात आली आहे.आरोपी सिंधासन मुकूंद एक्का हा ओरिसा राज्य आर्म्स पोलीस दलातील निलंबित कर्मचारी असून त्याच्यावर त्याच्या गरोदर प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याचे महिला केअरटेकर पार्वती किशोर खाका हिच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिच्यासोबत लग्न आणि घर घेण्यासाठी त्यांनी हा कट रचून ही दुहेरी हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पार्वती ही ओरिसाच्या सुंदरगड, लेफरीपाडा तर सिंधासन हा सुंदरगडच्या किंजीरकेला तालुक्याचा रहिवाशी आहे. सिंधासन हा तेथील आर्म्स पोलीस दलात कामाला होता. याच दरम्यान त्याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण झाले, त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते, त्यातून ही तरुणी गरोदर राहिली होती. तिच्याशी त्याला लग्न करायचे नव्हते, त्यामुळे तीन वर्षांपूर्वी त्याने तिची हत्या केली आणि पळून गेला होता. याप्रकरणी किंजीरकेला पोलीस ठाण्यात हत्येसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच त्याला त्याला किंजीरकेला पोलिसांनी अटक केली.

अडीच वर्ष कारागृहात राहिल्यानंतर त्याला अलीकडेच जामिन मंजूर झाला होता. याच दरम्यान त्याचे पार्वतीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते, या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नासह घर घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. याच दरम्यान पार्वती ही मखिजानी यांच्याकडे केअरटेकर म्हणून रुजू झाली होती. त्यांचे दोन्ही मुले अमेरिका आणि सिंगापूर येथे नोकरीनिमित्त राहत होते. घरातील इतर तिन्ही नोकर कामानंतर घरी जात होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. कपाटातील लाखो रुपयांचे दागिने आणि कॅश तिच्या निदर्शनास आले होते. ही माहिती तिने सिंधासनला दिली आणि या दोघांच्या हत्येची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे 20 जूनला रात्री आठ वाजता सिंधासन हा ओरिसा येथून थेट खार परिसरात आला. तिने त्याला घरी ठेवले होते. रात्री या दोघांनी संगमनम करुन नानक आणि दया मखिजानी यांचे हातपाय बांधून ओढणीने दोघांची हत्या करुन कपाटातील मिळेल ते दागिने आणि कॅश घेऊन ते रात्री उशिरा तेथून पळून गेले.

- Advertisement -

खार येथून ते सीएसटी रेल्वे स्थानकात आले आणि गितांजली एक्सप्रेसला ओरिसाला पळून जाण्याच्या तयारीत होते. याच दरम्यान या दुहेरी हत्येची माहिती खार पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या पथकातील योगेश शिंदे, नंदकुमार गोपाळे, लोणकर, खलील शेख, निलोफर शेख व अन्य पोलीस पथकाने तपासाला सुरुवात केली होती. तपासात या दुहेरी हत्येनंतर त्यांच्या घरातील सुरेखा ऊर्फ पार्वती ही महिला केअरटेकर पळून गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. तिने स्वतचा फोटो आणि इतर कोणतीही माहिती मखिजानी यांना दिली नव्हती, तिचा मोबाईल क्रमांक एका डायरीत होता, मात्र ते पानही तिने फाडून फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिची जास्तीत जास्त माहिती काढण्यावर पोलिसांनी भर दिला होता. ही माहिती काढताना पार्वती ही नियमित एका दुकानात जात होती, त्यातील एका दुकानदाराकडे तिचा मोबाईल क्रमांक पोलिसांना सापडला. दुकानातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पार्वतीचा फोटो पोलिसांना प्राप्त झाला, तिच्या मोबाईलवरुन ती सिंधासन एक्का या तरुणाच्या संपर्कात होती, या दोघांचेही मोबाईल लोकेशन 20 जूनच्या रात्री खार परिसरात होते, त्यामुळे या दोघांचा या दुहेरी हत्येत सहभाग उघडकीस आला होता. सीएसटी रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजमध्ये पार्वती दिसत होती, ती गितांजली एक्सप्रेसने ओरिसाला पळून जाण्याच्या तयारीत होती, त्यामुळे नागपूर रेल्वे पोलिसांच्या मदतीने खार पोलिसांनी पार्वती आणि सिंधासनला नागपूर रेल्वे स्थानकात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांचा ताबा घेतल्यानंतर त्यांना विमानातून मुंबईत पुढील चौकशीसाठी आणण्यात आले. मेडीकलनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने त्यांना 26 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या बॅगेतून पोलिसांनी सोन्याचे दागिने आणि कॅश असा चोरीचा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -