घरमुंबईगरजू गुणवंतांना संवेदनशील दात्यांचा मदतीचा हात

गरजू गुणवंतांना संवेदनशील दात्यांचा मदतीचा हात

Subscribe

गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक अडथळा येऊ नये, याकरता ठाण्यातील सेवा सहयोग फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे.

दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अनेक गुणवंत विद्याार्थी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही नेटाने अभ्यास करून या परीक्षेत उत्तम यश मिळवितात. मात्र उच्च शिक्षणासाठी केवळ गुणवत्ता असून भागत नाही. त्यासाठी पैशांचीही आवश्यकता असते. समाजातील अशा गरजू गुणवंत विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण केवळ पैशांअभावी अडू नये म्हणून ठाण्यातील सेवा सहयोग फाऊंडेशनची विद्याार्थी विकास योजना ही संस्था गेली आठ वर्षे सातत्याने शिष्यवृत्ती स्वरूपात मदत करीत आहे.

२८७ विद्याार्थ्यांना २ कोटी ३८ लाखांची मदत

गेल्या शैक्षणिक वर्षात (२०१८-१९) संस्थेने राज्यातील २६ जिल्ह्यातील २८७ गरजू विद्याार्थ्यांना २ कोटी ३८ लाख ३७ हजार १७६ रूपये इतकी मदत दिली आहे. संस्थेच्या माध्यमातून ३२४ देणगीदारांनी ही मदत उपलब्ध करून दिली. तसेच पुढील शैक्षणिक वर्षासाठी (२०१९-२०) ४०० विद्यार्थ्यांना सुमारे दोन कोटी रूपये मदत करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट असून याबाबत बैठक झाली आहे. त्यात संस्थेच्या भावी योजनांविषयी चर्चा देखील करण्यात आली आहे.

- Advertisement -

सेवा सहयोग फाऊंडेशनच्या विद्याार्थी विकास योजनेचा उपक्रम

टीजेएसबी बँकेतून निवृत्त झाल्यानंतर त्यानंतरचा काळ पूर्णवेळ समाजसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतलेल्या रविंद्र कर्वे यांनी आठ वर्षांपूर्वी इतर कार्याबरोबरच समाजातील गुणवंत विद्याार्थ्यांना परिचित दात्यांकडून आर्थिक मदत मिळवून देण्यास सुरूवात केली. सुरूवातीच्या काळात फक्त ठाण्यापुरत्या मर्यादित असलेल्या या चळवळीचे लोण अल्पावधीतच संपूर्ण राज्यभर पसरले. इतकेच नव्हे तर उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमधील विद्यार्थ्यांनाही संस्थेने मदत केली आहे.

मदत देण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी संस्थेचे पदाधिकारी भेट देतात. त्याची सर्व परिस्थिती पाहून त्याला मदत दिली जाते. कोणत्याही खाजगी शिकवणी वर्गाचे शुल्क संस्था देत नाही. महाविद्याालयाचे शुल्क, राहण्याचा खर्च, शैक्षणिक साहित्य, पुस्तके या कारणांसाठीच ही मदत केली जाते. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार दाते निवडले जातात. मात्र आपल्याला कोण मदत करतोय हे विद्यार्थ्यांना अथवा आपण कुणाला मदत करतोय, हे दात्यांना माहिती नसते. गेल्या काही वर्षांपासून काही कॉर्पोरेट कंपन्याही त्यांच्या सीएसआर योजनेतून या उपक्रमाला मदत देऊ लागल्या आहेत.

- Advertisement -

विद्यार्थ्यांचे यश

संस्थेने केलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे गाठण्यास सुरूवात केली आहे. दोन विद्यार्थ्यांनी नुकतेच त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना मायक्रोसॉफ्ट आणि सिटी बँकेत बारा लाखांचे पॅकेज मिळाले असून एकाला इंडसइंड बँकेत सहा लाखांहून अधिक रकमेचे पॅकेज मिळाले आहे. एकाने नॉटिकल इंजिनिअरिंग केले आहे. तर तीन विद्याार्थी एमबीबीएस झाले. ते आता इंटर्नशिप करून पुढील शिक्षणाची तयारी करीत आहेत. तसेच एका विद्यार्थींनी कंपनी सेक्रेटरी फाऊंडेशन कोर्समध्ये भारतात १७ वी आली आहे. तर संस्थेच्या मदतीचा लाभ घेत काही विद्याार्थी जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, इटली, कोरिया इथे विविध विषय शाखांचे उच्च शिक्षण घेत आहेत.

समाज ऋण फेडावे ही अपेक्षा

गरजू विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेली मदत हे समाजऋण समजून नोकरी लागल्यावर अशाच गरीब आणि गरजू मुलांसाठी मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा असते. २०१८-१९ या वर्षात या संस्थेच्या माध्यमातून मदत केलेल्या विद्यार्थ्यांनी सहा लाख रूपये पुढील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संस्थेकडे सुपूर्द केले आहे.

असे निवडले जातात विद्याार्थी

दहावीमध्ये किमान ९० टक्के आणि बारावीत किमान ८० टक्के तसेच विविध विषय शाखांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये चांगल्या महाविद्याालयात प्रवेश मिळविण्याएवढे गुण मिळविणारे गरजू विद्याार्थी, विद्याार्थिनी या योजनेतून मदत मिळण्यास पात्र ठरतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -