Corona: मुंबईतील एकूण कोरोना मृत्यूपैकी २५ टक्के मृत्यू एकट्या सेव्हन हिल रुग्णालयात  

Seven Hills Hospital recorded 25 percent of the total deaths due to corona in Mumbai
Corona: मुंबईतील एकूण कोरोना मृत्यूपैकी २५ टक्के मृत्यू एकट्या सेव्हन हिल रुग्णालयात  

मुंबईत सध्या कोविड थोडाफार नियंत्रणात येत आहे. मात्र कोविडची सुरुवात झाल्यापासून ते १९ जानेवारीपर्यंत मुंबईत विविध रुग्णालयात मिळून एकूण १६ हजार ४८८ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. मात्र त्यापैकी २५ टक्के ( ४,१२२) पेक्षाही जास्त रुग्णांचा मृत्यू एकट्या सेव्हन हिल्स या रुग्णालयात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सेव्हन हिल्स या पालिकेच्या अखत्यारित असलेल्या रुग्णालयात आतापर्यंत म्हणजे १५ जानेवारी २०२२ पर्यंत या रुग्णालयात ४६ हजार १५ कोविड रुग्ण दाखल झाल्याची नोंद आहे. त्यापैकी ४० हजार ६८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४ हजार ३५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरून मुंबईत कोविडमुळे मृत पावलेल्या एकूण रुग्णसंख्येच्या म्हणजेच १६ हजार ४८८ पैकी ४ हजार ३५६ रुग्णांचा मृत्यू एकट्या सेव्हन हिल्स रुग्णालयात झाले असून त्यामध्ये मुंबईमधील २ हजार ८२८ तर मुंबई बाहेरील ७९० तर ७३८ इतर यांचा समावेश आहे.

मुंबईत कोविड संसर्ग झाल्याने आतापर्यंत कोविडची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली. आता तिसरी लाट आली आहे. मुंबई महापालिका या तिसऱ्या लाटेला परतावून लावण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत निकराचा लढा देत आहे. मुंबईत कोविड आल्यापासून ते कालपर्यंत कोविड संसर्गामुळे १६ हजार ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक रुग्ण हे वयस्कर आणि गंभीर आजारी होते. तसेच, त्यांना कॅन्सर, किडनी, हृदयरोग, टीबी, बीपी इत्यादी आजारही असल्याचे समोर आले आहे. कदाचित ही कारणेही सदर रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत असू शकतात.

तसेच, मुंबईत १९ जानेवारीपर्यंत विविध रुग्णालयात आणि घरी राहून उपचार घेतल्यानंतर बरे झालेल्या कोविड रुग्णांची संख्या ९ लाख ६६ हजार ९८५ इतकी आहे. त्यापैकी ४० हजार ६८६ कोविडमुक्त रुग्ण हे एकट्या सेव्हन हिल्स या रुग्णालयातील आहेत. मात्र त्यांचे तुलनात्मक प्रमाण पाहिल्यास एकूण बरे झालेल्या रुग्णसंख्येच्या ५ टक्के पेक्षाही कमी आहे. मात्र कोविडच्या जीवघेण्या फंद्यातून त्यांची सुटका झाल्याने त्यांनी निश्चितच सुटकेचा नि:श्वास सोडला असावा.


हेही वाचा – अखेर सरकारी कर्मचारी भरतीच्या पॅनेलला स्थगिती