घरमुंबईपालिका कर्मचार्‍यांचे सातव्या वेतन आयोगाची थकबाकी गणेशोत्सवापूर्वी

पालिका कर्मचार्‍यांचे सातव्या वेतन आयोगाची थकबाकी गणेशोत्सवापूर्वी

Subscribe

सातव्या वेतन आयोगाचा वेतनवाढीचा करार तातडीने करावा, बायोमेट्रिक हजेरीची पद्धत बंद करावी, गटविमा योजना लवकरात लवकर सुरू करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी पालिका कर्मचार्‍यांनी आझाद मैदानात आंदोलन केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास कोणत्याही क्षणी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचार्‍यांच्या समन्वय समितीने दिला होता.

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका कर्मचार्‍यांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन करून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या थकीत २० टक्के रकमेचा हप्ता गणेशोत्सवापूर्वी दिला जाणार असून इतर मागण्यांबाबतही लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याची माहिती समन्वय समितीचे निमंत्रक अ‍ॅड. सुखदेव काशिद यांनी दिली.

…तर कर्मचाऱ्यांना १५ दिवसांत पैसे मिळणार

सातव्या वेतन आयोगाच्या करारामुळे निर्माण होणार्‍या एकूण थकबाकीमधून २० टक्के रकमेचा एक हप्ता गेल्या फेब्रुवारीमध्ये देण्यात आला होता. दुसरा हप्ता गणेशोत्सवापूर्वी दिला जाणार आहे. तसेच एक ऑगस्ट २०१७ पासून ज्या कामगार, कर्मचार्‍यांनी वैद्यकीय खर्च केला आहे त्यांनी दोन लाखापर्यंतची बिले सादर केल्यास त्यांना १५ दिवसांत निर्णय घेऊन पैसे दिले जातील, बायोमेट्रिक हजेरीमधील त्रुटी लवकरच दूर करण्यात येतील तसेच सहाव्या वेतन करारामधील त्रूटी दूर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या रामनाथ झा समितीला वेळ नसल्यामुळे दुसर्‍या अधिकार्‍याची नियुक्ती करुन काम सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. इतर मागण्यांबाबत येणार्‍या काही दिवसांत चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी मान्य केले असल्याचे अ‍ॅड. काशिद यांनी सांगितले.

- Advertisement -

कामगारांच्या मागण्यांबाबत गुरुवारी निर्णय

बेस्ट कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आता दोन्ही संघटनांशी चर्चा करत आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर मंगळवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये महापौरांसह शिवसेना प्रवक्ते अनिल परब, महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, कामगार सेनेचे सुहास सामंत, उदय आमोणकर आदी उपस्थित होते. यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार बेस्टच्या कामगारांना पगार देण्यास आयुक्त अनुकूल असल्याचे सांगितले. कामगार सेनेला सर्व मागण्या मान्य असून बेस्ट संयुक्त कृती समितीने उपोषण पुकारल्याने त्यांचेही म्हणणे महाव्यवस्थापक ऐकून घेत आहेत. त्यामुळे दोन्ही संघटनांचे म्हणणे ऐकून बागडे गुरुवारी दुपारी आपला अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करणार आहेत. त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान उपोषणकर्त्या संयुक्त कृती समितीच्या उपोषणाला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

शनिवारी खात्यात जमा होणार पगार

बेस्ट कामगारांना एस.टीच्या धर्तीवर गणेशोत्सवापूर्वी पगार दिला जाणार असून येत्या शनिवारी त्यांच्या खात्यात पगार जमा होईल,असे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी सर्व कर्मचार्‍यांच्या पगाराची रक्कम बँकेत जमा करण्याची प्रक्रीया पूर्ण केली जाईल,अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -