2013 Shakti Mills gang-rape case: शक्ती मिल कंपाऊंड गॅंगरेप, ३ आरोपींची फाशीची शिक्षा रद्द – HC

high court

मुंबईला हादरवून सोडणाऱ्या २०१३ च्या शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणात तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावला. एकुण पाच आरोपींपैकी तीन आरोपींना फाशीची कठोर शिक्षा व्हावी, अशी याचिका राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिकेवर निकाल देताना हायकोर्टाने फाशीची शिक्षा रद्द करत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. एका इंग्रजी पाक्षिकात इंटर्नशीप करणाऱ्या मुलीवर पाच जणांनी मिळून बलात्कार केल्याची घटना ही शक्तीमिल परिसरात घडली होती. त्यानंतर अवघ्या ७२ तासांमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

याआधी तिन्ही आरोपींनी २०१९ मध्ये सत्र न्यायालयाच्या फाशीच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. पण ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. शक्ती मिल बलात्कार प्रकरणात एकुण पाचपैकी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामध्ये एकाला जन्मठेपेची शिक्षा याधीच सुनावण्यात आली होती. तर एका अल्पवयीन मुलावर स्वतंत्र गुन्हा दाखल होऊन ज्युवेनाईल कायद्याअंतर्गत हे प्रकरण चालले होते. सत्र न्यायालयाच्या निकालाचा निकालावर उच्च न्यायालयात निकाल देताना न्यायमूर्ती साधना जाधव, पृथ्वीराज चव्हाण यांनी तीनही आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आज सुनावली. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे. शक्ती मिल बलात्कार प्रकरणानंतर पिडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी फाशीची मागणी जोर धरत होती. हायकोर्टाने कायद्याच्या दृष्टीने निर्णय ठरवला.

काय होते प्रकरण ?

एका पाक्षिकामध्ये इंटर्न फोटोग्राफर म्हणून काम करणारी एका २२ वर्षीय महिला आपल्या सहकाऱ्यासोबत मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंड परिसरात गेली. फोटो काढण्यासाठी आल्याचे सांगितल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या पाच जणांनी फोटोसाठी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यानंतर एका निर्जनस्थळी दोघांनाही नेण्यात आले. त्याठिकाणी दोघांनाही मारहाण करण्यात आली. तसेच महिलेवर पाच जणांना मिळून आळीपाळीने गॅंगरेप केला. या घटनेनंतर पिडितेने याबाबतची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अवघ्या ७२ तासांमध्ये आरोपींनी शोधून काढले. या गॅंगरेप प्रकरणात आरोपी विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

कोर्टाने निकाल देताना काय म्हटले ?

आरोपींनी केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांना जन्मठेपेची शिक्षा आम्ही देत आहोत. पण या प्रकरणात फाशीची शिक्षा देण्यासाठी या प्रकरणातील न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिला. विजय जाधव, मोहम्मद शेख आणि मोहम्मद अन्सारी या तिघांनाही फाशीएवजी जन्मठेपेची शिक्षा देत असल्याचा निकाल न्यायालयाने दिला. महिलेवर झालेली बलात्काराची ही समाजाच्या दृष्टीने धक्कादायक असून मानव अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. पण या प्रकरणी फाशीची शिक्षा टाळता येऊ शकते. त्यामुळेच कायदेशीर तरतुदीनुसारच हा निकाल देण्यात येत आहे. एखाद्या प्रकरणात फाशीची शिक्षा देणे म्हणजे आरोपीला आपण केलेल्या कृत्याचा पश्चातापाची संधी न दिल्यासारखी आहे. पण या प्रकरणी आरोपींना फक्त फाशीचीच शिक्षा गरजेची आहे अशीही स्थिती नाही. त्यामुळे आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप व्हावा म्हणूनच त्यांना जन्मठेपेची शिक्षा योग्य असल्याचे खंडपिठाने निकाला देताना स्पष्ट केले. तसेच आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेदरम्यान कोणताही पॅरोल नसेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले.