Bhiwandi Crime: भिवंडीत माजी शाखाप्रमुखाची मुलानेच केली हत्या

murder file photo
प्रातिनिधिक छायाचित्र

भिवंडी शहरातील कामतघर शिवसेना शाखेचे माजी शाखाप्रमुख गुरुनाथ पाटील (६८) यांची कौटुंबिक वादातून मुलानेच हत्या केल्याची घटना घडली आहे. ब्रिजेश पाटील असे हत्या करणाऱ्या मुलास नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.
कामतघर येथे शिवसेना वाढण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे गुरुनाथ पाटील हे आपल्या घरात दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास झोपले असताना ब्रिजेश याने मटण कापण्याच्या सुऱ्याने वडिलांच्या मानेवर, तोंडावर वार करून ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.

गुरुनाथ पाटील यांचे त्यांच्या मुलांसोबत मागील वर्षभरापासून कौटुंबिक वाद सुरु होते. त्याबाबत मयत गुरुनाथ पाटील यांनी वेळोवेळी नारपोली पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतु त्याबाबत अदखलपात्र गुन्हे नोंद करून मुलाला सोडून दिल्याने आज ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नारपोली पोलिसांनी हत्येच्या घटनेनंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात नेला. दरम्यान पोलिसांनी मुलगा ब्रिजेश यास ताब्यात घेऊन त्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

या तक्रारींची वेळीच दखल घेत पोलिसांनी मुलांवर कारवाई केली असती तर गुरुनाथ पाटील यांची हत्या झाली नसती अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक, माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी दिली आहे.