घरमुंबईअयोध्या मोहिमेवर जाणार्‍या शिवसैनिकांना आचारसंहिता

अयोध्या मोहिमेवर जाणार्‍या शिवसैनिकांना आचारसंहिता

Subscribe

न्यायालयाचा अवमान नको १ लाख शिवसैनिकांचे टार्गेट

प्रतिनिधी:- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या संकल्प सोहळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येत जमा होऊ लागले असून काल शिवसैनिकांचा पहिला जथ्था ठाण्यातून रवाना झाला. अयोध्येतील या कार्यक्रमासाठी मुंबई, ठाण्यासह राज्याला 1 लाख शिवसैनिकांचे टार्गेट सेना नेत्यांना देण्यात आले आहे. याची सुरुवात कालपासून झाली आहे. अयोध्येत जाण्यासाठी फैजाबाद, अयोध्या, गोंडा या एक्स्प्रेस बुक करण्यात आल्या आहेत. या तिन्ही गाड्या बुधवारी अयोध्येकडे रवाना होणार आहेत. अयोध्येतील मिशनला गालबोट लागू नये, म्हणून शिवसैनिकांना खास आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

मिशन अयोध्येसाठी विभाग प्रमुखांमार्फत आदेश देण्यात आले असून स्थानिक शिवसैनिकांना सेनेचा जाहीर कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. राज्यातल्या शिवसैनिकांना अयोध्यामिशनचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून सुमारे ५० हजार शिवसैनिक अयोध्येत रवाना होतील, अशी तयारी करण्याचे आदेश विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत. सगळे शिवसैनिक २३ तारखेलाच अयोध्येत जमा होणार आहेत. पण काही शिवसैनिक आतापासूनच अयोध्येत ठाण मांडून काम करत आहेत. मुबंई आणि ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कुठल्याही परिस्थितीत मिशन अयोध्या यशस्वी होण्यासाठी म्हणजेच गर्दी जमवण्यासाठी विभाग प्रमुखमार्फत विभागवार बैठका घेतल्या जात आहेत.

- Advertisement -

कुठल्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होता नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अयोध्या क्षेत्र हे याआधीच वादग्रस्त म्हणून घोषित झाले आहे. या वादग्रस्त भूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण आहे. न्यायालयाच्या नियमाबाहेर कुठलीही कृती होणार नाही, अशी खबरदारी घेण्यात आली आहे. न्यायालयाचा अवमान होईल आणि त्यासाठीच्या सुनावण्यांना फेर्‍या माराव्या लागतील, अशी कृती करू नये, असे बजावण्यात आले आहे. दिलेल्या आदेशाबाहेर कोणीही कुठलीही कृती करू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. या मिशनमध्ये महिला शिवसैनिकांना तसेच युवा सैनिकांनी येऊ नये, असे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.

अयोध्येतील या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी वसईतील एक शिवसैनिक अनंत पाटील भुईगांव येथून येत्या रविवारी बाईकवरून अयोध्येला निघणार आहेत. 1587 किलोमीटरचा प्रवास ते न थांबता अयोध्येपर्यंत करणार आहेत. वसई इथल्या भुईगांव ते धुळे ३३० कि.मी., धुळे ते भोपाळ ४५१ कि.मी., भोपाळ ते कानपूर ५७६ कि.मी. आणि कानपूर ते अयोध्या २३० कि.मी. असा हा दुचाकीवरून चार दिवसांचा प्रवास आहे. भाजी विक्रेता असणारे शिवसैनिक अनंत पाटील स्वखर्चातून हा प्रवास करणार आहेत. याआधी 2014 मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना अनंत पाटील यांनी असाच दुचाकीने दिल्लीपर्यंत प्रवास केला होता.

- Advertisement -

आमच्या पक्षाच्या या मिशनमध्ये अयोध्येतील संतांना विश्वास द्यायचा आहे. याशिवाय आमच्या पक्षाचा कुठलाही हेतू नाही. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच आमचा कार्यक्रम पार पडेल. यासाठी आवश्यक त्या सूचना विभाग प्रमुखांकडून शिवसैनिकांना देण्यात आल्या आहेत.
– अनील परब,गटनेता,विधानपरिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -