घरमुंबईबेस्ट मार्ग बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना फटका

बेस्ट मार्ग बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना फटका

Subscribe

बेस्टने काही महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणांवरील बसमार्गात बदल केल्याने आणि काही बसेस बंद केल्याने या मार्गावरील विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामाच्या, शाळेच्या, महाविद्यालयाच्या ठिकाणी वेळेवर कसे पोहचावे, असा प्रश्न पडला आहे. त्याचा फटका वांद्रे येथील एका १८ वर्षांच्या दृष्टिहिन फरजाना शेख या अंध विद्यार्थिनीला बसला आहे.

बारावीनंतर तिला फिजिओ थेरेपीच्या अभ्यासक्रम शिक्षणासाठी वरळीतील स्कूल ऑफ ब्लाईंड या संस्थेत सकाळच्या वेळेत जावे लागणार होते. या संस्थेत प्रवेश घेण्याचा तिचा विचार आहे. या संस्थेत तिला सकाळच्या वेळेत जावे लागणार आहे. त्यासाठी बेस्टच्या क्रमांक १ आणि ८६ नंबरची बस तिला सोयीची होती. मात्र, या मार्गावरील ही बस चालवणे थांबवण्यात आल्याने तिच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. फरजाना ही जन्मजात अंध नाही. तिला वयाच्या १५ व्या वर्षी एका आजारामुळे आपली दृष्टी गमवावी लागली. या मार्गावरील बसेस तिच्यासाठी सुविधेची होती. मात्र, मार्ग बदलण्यात आल्यामुळे आता वरळीतील संस्थेत प्रवेश कसा घ्यावा, असा प्रश्न तिच्यासमोर आहे.

- Advertisement -

आर्थिक राजधानीच्या डंका पिटणार्‍या मुंबई महानगरपालिकेला आणि बेस्ट प्रशासनाला मध्यवर्गीय मुंबईकरांना पुरेशी वाहतूक व्यवस्था पुरवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईची महत्त्वाची प्रवास सेवा असलेली बेस्ट आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे आज १०० पेक्षा जास्त बेस्टचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्याचा सरळ फटका वांद्रे येथील झोपडीवजा परिसरात राहणार्‍या फरजानाला बसला आहे. या भागातील इतर अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांनाही बसमार्ग बदलल्याचा फटका बसला आहे. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे खासगी टॅक्सी आणि रिक्षाचे भाडे गोरगरीब विद्यार्थ्यांना परवडत नाही. त्यामुळे शाळेत, महाविद्यालयात कसे जायचे, हा प्रश्न आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शाळा, महाविद्यालयात गैरहजेरी होत आहेत. यामध्ये सर्वाधिक फटका अंध-अपंगांना बसला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी संबंधित मार्गावर बेस्ट बसेस पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे.

दृष्टिहिन फरजाना शेख ही विद्यार्थिनी जन्मजात अंध नाही. 2015 ला तिला एक गंभीर आजार जडला होता. या आजारात तिची दृष्टी गेली. त्यानंतर बसचा प्रवास तिच्यासाठी सुविधेचा होता. लोकल ट्रेनने जाण्यासाठी स्टेशन गाठणे कठीण जाईल. आई-वडिलांना तिला वांद्रेतील घराजवळील बसस्टॉपवरून बेस्ट बस क्रमांक ८६ आणि ०१ या बसमध्ये बसवून देण्यास सोपे जाणार होते. मात्र, ही बस बंद झाल्याने तिच्या अडचणी वाढल्या आहेत.

- Advertisement -

मार्ग बंद करताना विद्यार्थ्यांचा विचार करा
मागील दोन वर्षांपासून बेस्ट प्रशासनाने वांद्रे पश्चिमेकडून खारला जाणारी २२२ क्रमांकाची बस सेवा बंद केल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. पूर्वी ही बस सेवा सुरू असताना आम्हाला शाळेत जाण्याकरिता खूप सुविधा व्हायची. मात्र, आता बस बंद केल्यामुळे आम्हाला लोकलचा प्रवास करावा लागतो. त्यानंतर खार रेल्वे स्टेशनवरून पायपीट करून शाळा, महाविद्यालय गाठावे लागते. ही बस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी नुरजहान मुराद हुसैन शेख या विद्यार्थिनीने दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना केली. बस क्रमांक १ आणि ८६ मार्गावरील बस सेवा बंद केल्याबाबत माहिती घेता येईल, असे बेस्टचे सहाय्यक जनसंपर्क अधिकार्‍यांनी सांगितले.

बेस्ट प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन बंद केलेले बेस्टमार्ग आणि बस सेवा पुन्हा सुरू करावेत, जेणेकरून अंध अपंगांना सुविधा होईल. सोबतच जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांनाही दिलासा मिळेल. आम्ही आमच्या संस्थेकडून त्यासाठी पाठपुरावा करत आहोत.
-श्वेता दामले, प्रमुख, हॅबिटाट अँड लाइव्हलीहूड वेल्फेअर असोसिएशन, वांद्रे (पूर्व)

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -