घरमुंबईएका दिवशीच महावितरणच्या ६ हजार कर्मचाऱ्यांचे रक्तदान

एका दिवशीच महावितरणच्या ६ हजार कर्मचाऱ्यांचे रक्तदान

Subscribe

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबीरात सहभागी होत रक्तदान केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

सामाजिक बांधिलकी जोपासत महावितरणच्या सुमारे ५ हजार ८२६ कर्मचाऱ्यांनी आज एकाच दिवशी राज्यभरातील विविध कार्यालयांत आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेत रक्तदानाचे महादान केले. शासकीय रुग्णालयांतील गोरगरीब रुग्णांना या रक्तदानाचा फायदा होणार आहे. एखाद्या शासकीय कार्यालयाने संपूर्ण राज्यात एकाच वेळी रक्तदान शिबीराची एवढ्या मोठ्या संख्येत यशस्वी आयोजन करणे व त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी सक्रीयपणे सहभागी होणे अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून या उपक्रमाचे सार्वत्रिक कौतुक होत आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

मोठ्या संख्येने महीला सहभागी

बारामती परिमंडलमध्ये सर्वाधिक ८०२ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणच्या राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले. त्या आव्हानास मोठा प्रतिसाद देत महावितरणकडून राज्यातील विविध कार्यालयात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ५ हजार ८२६ कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आज रक्तदान करून महादानाचे कर्तव्य बजावले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करून या राज्यव्यापी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

- Advertisement -

रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान

यावेळी केईम रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय पथकांनी आयोजनासाठी सहकार्य केले. तसेच राज्यभरातील रक्तदान शिबिरासाठी शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालये व रक्तपेढ्यांनी सहकार्य केले तर महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्य रक्तदानासाठी सकाळपासूनच उस्फुर्तपणे सहभागी होत होते. रक्तदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.

रक्तदानामध्ये परिमंडलनिहाय सहभागी झालेले कर्मचारी व त्यांचे नातेवाईक

मुख्य कार्यालय प्रकाशगड-१६४, बारामती परिमंडल-८०२, पुणे परिमंडल -११७, कोल्हापूर परिमंडल -६९२, रत्नागिरी परिमंडल-३७, नाशिक परिमंडल- ५००, औरंगाबाद परिमंडल -२३२, नांदेड परिमंडल-३०८, अकोला परिमंडल-४३०, नागपूर परिमंडल- ६३६, अमरावती परिमंडल-३६७, चंद्रपूर परिमंडल-३५६, गोंदिया परिमंडल-११०, लातूर परिमंडल-३८५, कल्याण परिमंडल-२९९, भांडूप परिमंडल- २४६, जळगांव परिमंडल- १४५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -