घरमुंबईसमिती अध्यक्षांची निवडणूक व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे नव्हे तर प्रत्यक्ष होणार

समिती अध्यक्षांची निवडणूक व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे नव्हे तर प्रत्यक्ष होणार

Subscribe

महापालिका सभागृहात पार पडणार मतदानाची प्रक्रिया

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे होईल अशी जी काही शक्यता होती ती आता दूर झाली असून याऐवजी आता प्रत्यक्ष सदस्यांच्या उपस्थित निवडणूक पार पडणार आहे.यासाठी महापालिका सभागृहात ही मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार असून महापालिका आयुक्तांनी अशाप्रकारे निवडणूक प्रक्रिया राबवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही प्रक्रिया राबवताना प्रत्येक सदस्यांची तपासणी करून तसेच त्यांना एन ९५ मास्कचे देत सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती व शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक ५ ऑक्टोबरला तर बेस्ट व सुधार समिती अध्यक्षांची निवडणूक ६ ऑक्टोबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपसह काँग्रेसनेही आव्हान दिले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरल्याने ही निवडणूक रंगतदार होईल,असे चित्र दिसत असले तरी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी भाजप आणि काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतात यावर सर्व अवलंबून आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या समिती सभागृहांमध्ये २६ सदस्यांची आसन क्षमता आहे. त्यामुळे कोरोना कोविड काळात सामाजिक अंतर राखून सदस्य बसल्यास या सभागृहाची जागा अपुरी पडू शकते. मात्र, व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवल्यास त्यातील तांत्रिक अडचणी लक्षात घेता मतदानाच्या प्रक्रियेवर आक्षेप निर्माण होईल. ती परिपूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ही बाब महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी महापालिका सभागृहात समित्यांच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. महापालिका सभागृहात २४० ते २५० सदस्यांच्या आसनाची क्षमता आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्यांमध्ये तीन फुटांचे अंतर राखून त्यांच्या आसनाची व्यवस्था करता येणार आहे. त्यामुळे वैधानिकसह भविष्यातील सर्व विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका महापालिका सभागृहात प्रत्यक्ष उपस्थितीत होणार आहे. ज्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया राबवताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही.

महापालिका आयुक्तांनी ही परवानगी देताना, कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रत्येक सदस्यांचे शरीराचे तापमान तसेच त्यांचे ऑक्सिजनचे पल्स रेट तपासून आणि एन ९५ मास्क तोंडाला लावूनच सभागृहात प्रवेश देण्याच्या अटी घातल्या आहेत.  ज्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना राखत ही निवडणूक पार पाडली जाणार आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -