घरमुंबई'सारथी'मध्ये अनियमितता : ८ महिन्यांतच अवस्था बिकट

‘सारथी’मध्ये अनियमितता : ८ महिन्यांतच अवस्था बिकट

Subscribe

सारथीमधल्या अनियमिततेवर बोट ठेवत ओबीसी व मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संस्थेवर आयएएस अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे.

मराठा-कुणबी समाजाच्या विकासासाठी सुरु करण्यात आलेली सारथी या संघटनेत अनियमितता झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी समोर आली. संघटना सुरु होऊन आठ महिन्यांतच ही अवस्था आल्याने या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी आता आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा ओबीसी व मुदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी मुंबईत दिली. दरम्यान, या संघटनेतर्फे जाहिरातींसाठी साडेपाच कोटी, सहा वाहनांसाठी ८० लाख आणि विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी तब्बल ८ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर कुठल्याही परिस्थितीत सारथी बंद होणार नसून या प्रकरणांची चौकशी सुरु असल्याची माहिती शुक्रवारी त्यांनी दिली.

मोठ्या प्रमाणात अनियमितता

मराठा-कुणबी समाजाच्या विकासासाठी सारथी ही संस्था गेल्या वर्षी सुरु करण्यात आली होती. या संस्थेच्या अनियमिततेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु झाली होती. त्यानुसार शुक्रवारी यासंदर्भात मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी व मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वरील माहितीवर शिक्कामोर्तब केलं. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, या संस्थेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची बाब समोर आले आहे. मदत पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांनी पदाचा राजीनामा दिला असून हा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केला आहे. मनमानी पद्धतीने परिहार यांनी कामकाज चालवल्याचे आणि आवश्यकता नसताना पदभरती तसेच वाहन खरेदी आणि जाहीरातींवर कोट्यावधी रूपये उधळल्याचे दिसून आले असल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

क्षमतेपेक्षा जास्त माणसं भरली

दरम्यान, संस्थेने कोणताही खर्च करताना सरकारची परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. संस्थेत जागा मर्यादित असताना संस्थेने या ठिकाणी ३०० माणसे भरली. या प्रत्येकाला १८ ते २० हजार रुपयांचे मानधनही देण्यात आले. यूपीएससीच्या प्रशिक्षणासाठी एका विद्यार्थ्यामागे प्रशिक्षण देणाऱ्या अ‍ॅकेडमीला २ ते अडीच लाख रुपये देण्यात आले. त्याचप्रमाणे एमपीएससीच्या १२७ विद्यार्थ्यांसाठी १ कोटी ९३ लाखांचा खर्च, जेएनएफच्या १४ विद्यार्थ्यांसाठी ४२ लाख तर एनडीएच्या १३ विद्यार्थ्यांसाठी २० लाखांचा खर्च करण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

मग परिहार यांनी मोबदला का मागितला?

या प्रकरणी परिहार यांनी कोणताही मोबदला न घेता कामकाज केल्याबाबत केलेल्या वक्तव्यावर उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, ‘संचालक म्हणून सव्वादोन लाख रुपये मोबदला मिळावा असा प्रस्ताव त्यांनी शासनाला का सादर केला होता? याचेही उत्तर त्यांना द्यावे लागेल. या विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता तसेच अध्यक्ष संदानंद मोरे यांच्या या गैरव्यवहारात काही भूमिका होत्या किंवा नाही तसेच या साऱ्या अनियमितता होत असताना त्यामागे मागील सरकारमधील कोणा मोठ्या नेत्याचा सहभाग होता काय, याची माहिती सनदी अधिकारी नेमल्यानंतर चोकशी केल्यावर समोर येणार असल्याने तूर्तास आपण यावर अधिक भाष्य करत नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisement -

‘कोणत्याही परिस्थितीत ‘सारथी’ बंद होणार नाही’

सारथी संस्थेच्या अनियमिततेचा प्राथमिक अहवाल सरकारला प्राप्त झाला असून, यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच सारथी संस्था ज्या उद्देशासाठी स्थापन करण्यात आली आहे त्या उद्देशासाठीच संस्थेचे काम चालेल, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सारथी संस्थेवर भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी नेमणार असल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीत सारथी संस्था बंद होणार नाही याची सरकार हमी देत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -