घरमुंबईविद्यार्थ्यांचा ओढा पुन्हा आर्टस, कॉमर्स, सायन्सकडे

विद्यार्थ्यांचा ओढा पुन्हा आर्टस, कॉमर्स, सायन्सकडे

Subscribe

शिक्षण कोणत्या विषयामध्ये पूर्ण करायचे याची खरी दिशा बारावीच्या परीक्षेनंतर ठरत असते. त्यामुळे बरेच विद्यार्थी बारावीला उत्तम गुण मिळवण्याच्या प्रयत्नांत असतात. विविध शाखांना प्रवेश घेण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मतभिन्नता असली तरी यावर्षी पारंपरिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेमध्ये आतापर्यंत तब्बल 1 लाख 12 हजार 851 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यामध्ये कॉमर्स शाखेला विद्यार्थ्यांनी अधिक पसंती दिली आहे. त्याखालोखल आर्ट्स व सायन्स या शाखेला विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे.

बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा हा इंजिनियरींग, कम्प्युटर सायन्स या शाखांकडे अधिक असायचा मात्र गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा ओढा पुन्हा पारंपरिक अभ्यासक्रमाकडे वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी ही विद्यार्थ्यांचा ओढा कॉमर्स, आर्ट्स व सायन्स या पारंपरिक शाखांकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठाकडून राबवण्यात येत असलेल्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नाव नोंदणी प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी कॉमर्स शाखेला सर्वाधिक पसंती दिली आहे.

- Advertisement -

कॉमर्स शाखेसाठी तब्बल 66 हजार 518 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्याखालोखाल आर्ट्स शाखेसाठी विद्यार्थ्यांनी 20 हजार 508 तर सायन्स शाखेसाठी 13 हजार 520 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा बारावीच्या निकालात घट झाली असली तरी विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमाला दिलेल्या पंसतीमुळे कॉमर्स, आर्ट्स व सायन्स शाखा असलेल्या कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. मागील वर्षी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीच्या प्रक्रियेसाठी ४ लाख ५६ हजार ६५४ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

सध्या विद्यार्थ्यांचा बॅकिंग क्षेत्र, स्पर्धा परीक्षा देण्याकडे अधिक कल आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आर्ट्स हा पर्याय चांगला समजण्यात येतो. तर कॉमर्स विषयाने बँकिग क्षेत्रासह अकाऊंटशी संबंधित विविध क्षेत्र खुली होतात. त्यामुळे बारावीचा निकाल यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी लागला असला तरी त्याचा परिणाम कॉमर्स, आर्ट्स या शाखांवर फारसा होणार नाही. कॉमर्स व आर्ट्स शाखेला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेण्याची शक्यता आहे, असे मत गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या भवन्स कॉलेजचे प्राचार्य श्रीमंत राठोड यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाशी सलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात विविध पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत अनेक नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यासक्रम, विषय आणि महाविद्यालयाची निवड करुन प्रवेश घ्यावा.
– प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने ऑनलाईन चॅटबोट, व्हिडिओ ट्युटोरिअल आणि हेल्पलाईनची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी आल्यास ते 020-66834821 या हेल्पलाईनवर संपर्क करु शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -