विधी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती

पहिल्या प्रवेश फेरीत तीन वर्षे अभ्यासक्रमाला ६ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी तर पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी ३ हजार २१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

काही वर्षांपासून विधी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहेत. यावर्षी पहिल्या प्रवेश फेरीत तीन वर्षे अभ्यासक्रमाला ६ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी तर पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी ३ हजार २१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
बदलत्या काळाबरोबरच कायद्याबाबत जागृत पिढी तयार होत असल्याने कायद्याचे शिक्षण घेण्याकडे तरुणाईचा ओढा अधिक दिसत आहे.

राज्यभरातील तीन वर्षे अभ्यासक्रम असलेल्या १४७ विधी महाविद्यालयात १६ हजार २६० जागा कॅप प्रवेशासाठी तर संस्थास्तरावर १ हजार ३४० जागा आहेत. या जागासाठी ४६ हजार १६७ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. त्यापैकी पहिल्या यादीत ६ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दुसरी यादी शनिवारी जाहीर झाली आहे. तर एलएलबी ५ वर्ष अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील १३२ महाविद्यालयात सुमारे १० हजार ६४७ जागा आहेत. तर संस्थास्तरावरील जागा १ हजार १०७ जागा आहेत. या जागावर प्रवेश मिळवण्यासाठी १२ हजार ८८९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्यापैकी अंतिम यादीत नोंद झाली आहे. यापैकी पहिल्या यादीत ३ हजार २१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतेले आहेत. तीन वर्षांऐवजी पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे काही विद्यार्थ्यांचा कल आहे. हमखास रोजगार मिळवून देत असलेल्या एलएलबी अभ्यासक्रमाला पसंती देत असल्याचे चित्र यंदाही कायम असल्याचे सीईटी सेलकडून मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते.