वृक्ष छाटणीप्रसंगी नागरिक व कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या, उपायुक्तांचे आदेश

Take care of the safety of citizens and workers during tree cutting
वृक्ष छाटणीप्रसंगी नागरिक व कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या, उपायुक्तांचे आदेश

पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ते, चौक, खासगी जागेत धोकादायक वृक्ष, वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. मात्र त्याबाबत कृती करताना नागरिकांच्या व कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात यावी. तसेच, पावसाळ्यात आपत्कालीन कक्ष व विभाग कार्यालयातील आपत्कालीन कक्ष यांच्याशी समन्वय साधून मुंबईकरांना जास्तीत-जास्त योग्यप्रकारे सेवा देण्यात यावी, असे आदेश उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार यांनी उद्यान खात्याला दिले आहेत.

याप्रसंगी, पालिका उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, उद्यान विभागाचे सर्व अधिकारी, वृक्ष छाटणी पर्यवेक्षक आणि खासगी संस्थांमधील उद्यान तज्ज्ञ उपस्थित होते. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात २,००० मिमी ते २,२०० मिमी पाऊस पडतो. कधी कधी पावसाळ्यात फक्त २ – ३ दिवसांतच २५% ते ३५% इतका पाऊस पडतो. यावेळी, अतिवृष्टी होऊन वाऱ्यासोबत रस्ते, चौक, खासगी जागेतील झाडे अथवा लहान – मोठ्या फांद्या कोसळतात. ही झाडे, फांद्या एखाद्या वाहनावर, व्यक्तींवर, घर, दुकाने यांवर कोसळतात.

त्यामुळे कधी कधी जीवित व वित्तीय हानी होते. अशा घटनात अनेक व्यक्ती जखमी होतात. तर काही व्यक्ती कायमस्वरूपी दिव्यांग होतात. त्यामुळे पालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांलगत असलेल्या धोकादायक झाडे, फांद्या तोडण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करते. तर खासगी जागेतील सोसायटी, इमारतीना त्यांच्या हद्दीतील धोकादायक झाडे, फांद्या तोडून टाकण्याची कायदेशीर कारवाई करण्याचे पालिकेकडून फर्मावण्यात येते. मात्र धोकादायक झाडे, फांद्या शास्त्रोक्त पद्धतीने तोडायची कशी याबाबत योग्य प्रशिक्षण आवश्यक असते.

यादृष्टीनेच, मुंबईतील वृक्षांची योग्यप्रकारे जोपासना कशी करावी आणि आवश्यकतेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष छाटणी कशी करावी व छाटणी करताना पक्षांच्या घरट्यांची कशी काळजी घ्यावी, आदी पैलूंसंदर्भात महापालिकेच्या उद्यान अधिकाऱयांना आंतरराष्ट्रीय वृक्षतज्ज्ञ परिषदेमार्फत प्रमाणित वृक्षतज्ज्ञांकडून बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले.

मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी, तसेच कंत्राटदारांकडे असलेले उद्यान विषयक तज्ज्ञ व त्यासोबत मुंबईतील ज्या आस्थापनांकडे उद्यान विषयक तज्ज्ञ आहेत, अशा मुंबईतील बहुतांश उद्यान विषयाशी निगडित अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आयोजित या उपक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय वृक्षतज्ज्ञ परिषदेमार्फत प्रमाणित वृक्षतज्ज्ञ वैभव राजे व इतर तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले. पावसाळ्यात करण्यात येणारी वृक्षांची छाटणी आणि कापणी याविषयी मार्गदर्शनपर सत्रासह प्रात्यक्षिक देखील यामध्ये समाविष्ट होते, अशी माहिती यासंदर्भातील माहिती, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.


हेही वाचा : राणी बाग सुट्ट्यांमुळे बुधवारीसुध्दा सुरु ठेवा, साप्ताहिक सुट्टीमुळे पर्यटकांचा हिरमोड