घरमुंबईठाण्यात टकटक गँगचा धुमाकूळ

ठाण्यात टकटक गँगचा धुमाकूळ

Subscribe

दोन कारचालकांची लुबाडणूक

सिग्नलला किंवा वाहतूक कोंडीत थांबलेल्या कारच्या काचेवर ‘टकटक’ करून वाहनचालकांच्या नकळत मुद्देमाल लांबवणार्‍या टकटक टोळीने ठाण्यात उच्छाद मांडला आहे. मंगळवारी दोघा कारचालकांना या टोळीने चांगलाच हात दाखवल्याच्या दोन घटना पूर्वद्रुतगती महामार्गावर घडल्या. याप्रकरणी, नौपाडा आणि कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घोडबंदर येथील हाईडपार्क परिसरात राहणारे अमित राघवन (33) हे मंगळवारी रात्री कारने घरी जात होते. ते तीनहात नाका उड्डाणपुलावरून नाशिकच्या दिशेने कार चालवित जात असताना वाहतूक कोंडी झाली. यादरम्यान, एका व्यक्तीने त्यांच्या कारवार टकटक करून कारची काच खाली घेण्यास भाग पाडले आणि कार व्यवस्थित चालविण्याची समज दिली. त्याचवेळी कारच्या दुसर्‍या बाजूकडील काचेवर अन्य एका व्यक्तीने ‘टकटक’ करून राघवन यांना कारची काच घाली घ्यावयास लावली. त्यानंतर, संधी साधून पहिल्या भामट्याने राघवन यांचे लक्ष विचलित करून कारमधील मोबाईल आणि पाकीट चोरी केले. वाहतूक कोंडीतून पुढे गेल्यावर लुबाडणूक झाल्याचे राघवन यांच्या लक्षात आले. तोपर्यंत भामटे पसार झाले होते. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दुसरी घटना कापूरबावडी नाक्यावरील माजिवडा बस थांब्यावर घडली. हिरानंदानी इस्टेट येथे राहणार्‍या 59 वर्षीय महिला मंगळवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मॉलमध्ये खरेदीसाठी कारने निघाल्या होत्या. तेव्हा, अशाच प्रकारे कारच्या काचेवर टकटक करून दोघा भामट्यानी महिलेचे लक्ष विचलित करून गाडीतील महागडा 89 हजारांचा अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल लांबवला. याप्रकरणी, कापूरबावडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यापूर्वीही ठाण्यात टकटक टोळीने उच्छाद मांडला होता. सिग्नलवर असे प्रकार सातत्याने घडत होते. तेव्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही काळ हा प्रकार बंद झाला होता. मात्र, एकाच दिवशी दोन घटना घडल्याने टकटक टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -