Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Thackeray Memorial : भूमीपूजनाच्या ५० निमंत्रितांमध्ये कोण? रंगले मानापमान

Thackeray Memorial : भूमीपूजनाच्या ५० निमंत्रितांमध्ये कोण? रंगले मानापमान

Related Story

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून अवघ्या ५० जणांनाच निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तसेच विभागाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रित न केल्याने या संपुर्ण कार्यक्रमाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनीही या कार्यक्रमासाठीचा प्रोटोकाल आणि निमंत्रित या विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे एकुणच ढिसाळ आयोजनाबाबत एकच सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी निमंत्रिताची ५० जणांची यादीही त्यानिमित्ताने चर्चेत आली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ५० निमंत्रितांची यादी तयार करण्यात आली होती. यादीमध्ये राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य आहेत, त्यांनाही स्थान न देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एमएमआरडीएमार्फत या संपुर्ण स्मारकाच्या निविदा प्रक्रियेपासून प्रकल्प उभारणीच्या कामाची जबाबदारी असणार आहे. ५० जणांच्या निमंत्रितांच्या यादीमध्ये मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर आणि पालकमंत्री अस्लम शेख यांनाही स्थान मिळालेले नाही. निमंत्रण मिळालेल्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना निमंत्रण पत्रिकेवर स्थान मिळाले आहे. त्याशिवाय निमंत्रण मिळालेल्या यादीमध्ये टाटा ट्रस्टचे काही लोक, कॅटरिंग स्टाफ, एमएमआरडीएचे पाच अधिकारी, वास्तू विशारद यांनाही जागा मिळाली आहे. पण त्याचवेळी एमएमआरडीएने राजकीय नेत्यांमध्ये विधान सभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलेले नाही.

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती सोहळ्याच्या अनावरणाच्या वेळी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात खुजेपणा नसल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ज्यावेळी स्मारकाचे लोकार्पण होईल त्यावेळी सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमासाठी फक्त काही निवडक जणांनाच निमंत्रित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या मदतीची आम्हाला जाणीव आहे. ज्यावेळी स्मारक पुर्णत्वास येईल त्यावेळी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांचा यथोचित सन्मान करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. तर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोणालाही छापील निमंत्रण देण्यात आले नाही असे सांगण्यात आले आहे. आज शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस असल्याचेही त्यांनी सांगितले. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले आहे की, शिवसेना प्रमुख हे केवळ शिवसेनेचे नव्हते, हे उभ्या महाराष्ट्राचे होते एवढी संकुचित वृत्ती दाखवायला नको होती असेही दरेकर म्हणाले. तर भाजप आमदार नितेश राणे यांनीही एकुणच कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलबाबत आणि निमंत्रणाबाबतचा सवाल उपस्थित केला आहे.

- Advertisement -

तर मनसेने राज ठाकरे यांना भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला न बोलावल्याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, भूमीपूजन कोण करत आहे, त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांचे विचार राज ठाकरे पुढे नेत आहेत, हीच मराठी माणसाची भावना असल्याचेही संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


 

- Advertisement -