घरCORONA UPDATEरुग्णवाहिकेअभावी कोरोनाबाधितांचे हाल; तर नागरिक प्रतीक्षेत बेहाल

रुग्णवाहिकेअभावी कोरोनाबाधितांचे हाल; तर नागरिक प्रतीक्षेत बेहाल

Subscribe

कोरोना कोविड-१९च्या बाधित रुग्णांसाठी असलेल्या रुग्णवाहिकेच्या सेवांबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील जी-उत्तर विभाग निरिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु त्यांचा कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी तीन तासांहून अधिक रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागली. महापालिकेच्या अधिकाऱ्याला जर रुग्णवाहिकेची एवढी प्रतीक्षा करावी लागली तर सर्वसामान्य रुग्णांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे कोरोना कोविड-१९च्या बाधित रुग्णांसाठी असलेल्या रुग्णवाहिकेच्या सेवांबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान भाजपने खासगी रुग्णवाहिका सेवा सुरु न केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करून त्या सुविधा महापालिकेच्या ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.

महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील करनिर्धारण व संकलन खात्यातील विभाग निरिक्षक यांच्याकडे धारावीत अन्नवाटपाची जबाबदारी होती. पहिल्या दिवसापासून अन्न पाकिटांचे वाटपाचे काम समर्थपणे पार पाडणाऱ्या या विभाग निरिक्षकाला ताप येवू लागल्याने त्यांनी आपल्या राहत्या चारकोपमधील निवासस्थानाजवळील खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु केले होते. त्यानुसार, त्यांनी एसआरएलमध्ये कोविडचे वैद्यकीय चाचणीही केली. याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, बुधवारी दुपारी ते जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत होते. तब्बल तीन तास प्रतीक्षा करूनही त्यांना रुग्णवाहिका सेवा मिळू शकली नाही. त्यामुळे अखेर जी-उत्तर विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आर-मध्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कल्पना दिल्यानंतर त्वरीत रुग्णवाहिका उपलब्ध झाली.

- Advertisement -

विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून अशाचप्रकारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे किंवा कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना नेण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांसाठी प्रतीक्षा करावी लागते. प्रत्येक रुग्णाला नेण्यासाठी कमीत कमी तीन तास आणि जास्तीत जास्त एक दिवस प्रतीक्षा करावी लागते. तसेच काही पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह रुग्णाला होम क्वारंटाईन करण्यासाठी पुन्हा घरी सोडण्यासाठीही रुग्णवाहिकेसाठी प्रतीक्षा करावी लागते. मुंबईत आज अनेक महापालिका व खासगी रुग्णालयांबाहेर खासगी रुग्णवाहिकांची रांग दिसत असली तरी प्रत्यक्षात कोरोना विरोधातील लढ्यात या रुग्णवाहिका अद्यापही रस्त्यावर उतरलेल्या दिसत नाही. विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिका आहेत. परंतु कोरोनाबाधित तसेच संशयित रुग्णांना नेण्याचा भार सध्या महापालिकेच्या रुग्णवाहिका आणि १०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिकांच्याच खांद्यावर आहेत.

काही दिवसांपूर्वी भांडुप येथील क्वारंटाईन सेंटरमधील मुलीला कुर्ला भाभा रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. परंतु भाभा रुग्णालयात तिला दाखल करून घेण्याची गरज नसल्याने पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्यास सांगितले. परंतु तिथेही तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर रुग्णवाहिका न आल्याने तिने कुर्ला ते कांजूरमार्ग असा प्रवास करत क्वारंटाईन सेंटर गाठले होते. त्यामुळे सध्या खासगी रुग्णवाहिका महापालिकेने ताब्यात घेण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

- Advertisement -

वांद्रे पश्चिम येथेही एका कुटुंबाला कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांनी १०८ क्रमांकावर संपर्क केला. परंतु त्यांना त्याचा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्थानिक नगरसेविकेला संपर्क केला. नगरसेविकेने महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षात संपर्क साधूनही त्यांना प्रतीक्षा करावी. त्यामुळे त्यांनी खासगी रुग्णवाहिकेशी संपर्क केला. परंतु त्यांना खासगी रुग्णवाहिकेसाठी १२ हजार रुपये सांगितले. समोरची व्यक्ती श्रीमंत असूनही त्यांनी ती सेवा नाकारली आणि मग समाजाच्या रुग्णवाहिकेतून त्यांनी रुग्णालय गाठल्याचे भाजपच्या नगरसेविक स्वप्ना म्हात्रे यांनी सांगितले. कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णवाहिकेच्या सुविधेबाबत प्रचंड चिड म्हात्रे यांनी व्यक्त करत एरव्ही रुग्णालयाबाहेर उभ्या असणाऱ्या खासगी रुग्णवाहिका गेल्या कुठे असा सवाल त्यांनी केला. मुंबईतील सर्व दवाखाने व नर्सिंग होम्स सुरु करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी कायदेशीर कारवाईचा धाक दाखवला. त्यानंतर सर्व दवाखाने व नर्सिग होम्स सुरु झाले. त्यामुळे याचप्रमाणे कारवाईचा धाक खासगी रुग्णवाहिकांना दाखवण्याची वेळ आली. कोरोनासाठी आता खासगी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून घ्यावी आणि ज्या रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी तयार नसतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आपण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करत असल्याचे स्वप्ना म्हात्रे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -