घरमुंबईहाफकिनमध्ये देशातील पहिले जैववैद्यकीय म्युझियम

हाफकिनमध्ये देशातील पहिले जैववैद्यकीय म्युझियम

Subscribe

टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उभारणार संग्रहालय

जैववैद्यकीय व वैद्यकीय क्षेत्रात देशात करण्यात आलेल्या विविध संशोधनाची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी मिळावी. विद्यार्थ्यांना संशोधन कसे केले जाते हे पाहता यावे व त्यांच्यातील संशोधकवृत्तीला चालना मिळावी, या उद्देशाने देशातील पहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरील जैववैद्यकीय संग्रहालय हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय संग्रहालय उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर हाफकिन इन्स्टिट्यूट व टाटा ट्रस्टमध्ये करार करण्यात आला.

जैववैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी देशातील पहिली हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेने आपल्या विविध महत्त्वपूर्ण संशोधनाने देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. हाफकिनने साप, विंचू, घटसर्प, अ‍ॅण्टीरेबीज, प्रतीधनुर्वात लस, दमा, ताप, खोकला यासह मानसिक आजारांवर विविध औषधे व लसी तयार केल्या आहेत. हाफकिनच्या लसींना जगभरात मोठी मागणी आहे. हाफकिनच्या गौरवशाली इतिहासाची सार्‍या जगाला ओळख व्हावी या उद्देशाने हाफकिनमध्ये आंतरराष्ट्रीय वस्तूसंग्रहालय उभारण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी टाटा ट्रस्टसोबत सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेऊन म्युझियम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी वस्तूसंग्रहालयाचा व्यापक आराखडा बनवण्याची जबाबदारी टाटा ट्रस्टवर असणार आहे. हा आराखडा वर्षभरामध्ये तयार करण्यात येणार आहे. आराखडा तयार झाल्यानंतर त्याला निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

भारतातील विविध वैद्यकीय व जैववैद्यकीय संशोधन संस्थांनी केलेल्या संशोधनाची माहिती वस्तूसंग्रहालयात असणार आहेत. तसेच संशोधनासाठी लागणारी विविध साधने, उपकरणे, विविध सर्जरींची माहिती, नॅनो टेक्नोलॉजीचे तंत्र, थ्री डी प्रिंटींगचे तंत्र, जयपूर फूट यासारखी भारतीय संशोधनकांची उत्तमोत्तम संशोधने वस्तूसंग्रहालयात पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. तसेच प्रत्येक संशोधनासाठी वेगवेगळे विभागही बनवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संशोधनाची सखोल माहिती नागरिकांना मिळणार आहे. तसेच भावी पिढीला संशोधन कसे केले जाते, ते करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. संशोधक होण्यासाठी काय करावे लागते,याची माहितीही वस्तूसंग्रहालयात देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्तीला चालना मिळण्यास मदत होईल व विद्यार्थी विज्ञानाकडे वळण्यास मदत होईल, असा विश्वास हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक यांनी व्यक्त केला.

सध्या हाफकिन संस्थेमध्ये असलेल्या वस्तूसंग्रहालयात डॉ. वॉल्डेमर हाफकिन व संस्थेने केलेल्या संशोधनाची माहिती उपलब्ध आहे. परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वस्तूसंग्रहालयात देशातील वैद्यकीय व जैववैद्यकीय क्षेत्रातील सर्व संशोधन पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. यासंदर्भातील करार नुकताच झाला आहे.
– डॉ. निशिगंधा नाईक, संचालक, हाफकिन संस्था

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -