घरमुंबईगिरणी कामगारांसाठी मुंबईनजीक घर

गिरणी कामगारांसाठी मुंबईनजीक घर

Subscribe

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. त्यासाठीच येत्या १५ दिवसांमध्ये राज्याचे मुख्य सचिवांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. मुंबईच्या आसपासच गिरणी कामगारांना घर देण्याचा म्हाडाचा प्रयत्न राहील अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. मुंबईतील १ लाख ७० हजार गिरणी कामगारांच्या घरांसाठीचा प्रश्न हा प्राधान्याने सोडविण्यात येणार आहे. मुंबईनजीक मोठी जागा मिळणे त्यासाठीच गरजेचे आहे. मुंबई महानगर प्रदेशात ही जागा मिळवून देण्यासाठी मुख्य सचिवांच्या बैठकीत जागा निश्चित करण्यात येईल. गिरणी कामगारांशी संबंधित महसुली नोंदी आणि पुरावे मिळवूनच यापुढची कारवाई होईल असे त्यांनी सांगितले.

आश्वासनांचे इमले

निवडणूक पूर्व लोकप्रिय घोषणांसाठी म्हाडाच्या लॉटरीचे व्यासपीठही राजकीय नेतेमंडळींनी सोडले नाही. पहाडी गोरेगावच्या ६५०० घरांच्या योजनेसाठी भूमीपूजनासाठीचा मुहूर्त हा त्याचाच एक भाग आहे. तर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांसाठी म्हाडाकडून सबसिडीच्या रकमेचा भरणा करण्याचेही आश्वासन आज देण्यात आले. परवडणार्‍या दरातील घरांसाठीचे मॉडेल ठरवतानाच नवीन ५ लाख स्वस्त घरांची घोषणा पीपीपी आणि जॉईंट व्हेंचरनुसार करणार असल्याची घोषणाही आज करण्यात आली. शिवाय बोरिवली नॅशनल पार्कातील २७ आदिवासी पाड्यांच्या पुनर्वसनासाठी २४ हजार घरे बांधण्याच्या निविदा प्रक्रियेचाही आज उल्लेख झाला. मोतीलाल नगरमध्ये १८ हजार घरे बांधण्याचा मुद्दाही हादेखील लोकप्रिय घोषणांचाच एक भाग. शिवाय मुंबईतील घरांच्या किमती कमी करताना उर्वरित राज्यातील घरांच्या किमती या कमी करण्याचे आश्वासनही देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -