घरमुंबईठाण्यातील ‘पूल’ मतदार जोडणार की तोडणार

ठाण्यातील ‘पूल’ मतदार जोडणार की तोडणार

Subscribe

लोकसभा निवडणुकीत पुलांचे राजकारण

ठाण्यातील अनेक धोकादायक पुलांचा मुद्दा आगामी लोकसभेच्या प्रचारात कळीचा मुद्दा ठरणार आहे. अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांचे उद्घाटन करून श्रेय लाटण्याच्या नादात पुलाच्या बांधकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच ठाण्यातील अनेक जुने पूल धोकादायक झाले असून, प्रशासन याबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे- मुंबईला जोडणार्‍या कोपरी पुलावर जाऊन प्रत्यक्ष पुलाची पाहणी करून या पुलाच्या दुर्दशेबद्दल सत्ताधार्‍यांवर टीका केली आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी हा पूल तत्त्काळ दुरुस्त करण्याची मागणीही मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. ठाण्यातील पुलांचे राजकारण लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा विषय ठरणार आहे.

कोपरीचा पूल तर अत्यंत धोकादायक झाला आहे. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना 5 नोव्हेंबर 2015 रोजी पत्र लिहून या पुलावरील जड वाहतूक बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. या पत्राला तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही सरकारकडून कोणतीही कारवाई नसल्याबाबत आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. तर पूल कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी ठाण्यातील कोपरी पुलाची अवस्था आहे. पुलाच्या खालून रेल्वे आणि वरून वाहने जातात. पुलाच्या खालच्या भागाचा स्लॅब कोसळला आहे. असे असताना पालकमंत्री शिंदे, कशाची वाट बघत आहेत?’ असा सवाल जाधव यांनी केला आहे. तसेच ठाणे-कल्याण मार्गावरील सर्व पुलांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी जाधव यांनी केली.

- Advertisement -

याशिवाय ठाणे स्थानकातील कल्याण दिशेकडचा सन 1972 पासून सेवेत असलेला पूल अतिशय जीर्ण आणि धोकादायक झाला आहे. या पुलावर उभे राहिल्यास बाजूने चालणार्‍या गर्दीमुळेही हादरे बसत आहेत. येथील दोन जुने पूल जीर्णावस्थेत असून, रेल्वेच्या सुरक्षा समितीच्या सर्वेक्षणामध्येही ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे या पुलांच्या दुरुस्तीसाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे नियोजन रेल्वेकडून सुरू करण्यात आले होते. या पुलाच्या कामांच्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. धोकादायक अवस्थेत असलेला कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलाची दुरुस्ती मध्य रेल्वेने सुरू केली आहे. आचारसंहितेच्या आधी घाईघाईने विद्यमान खासदार राजन विचारे यांनी याचे उद्घाटन करून श्रेयही घेतले, परंतु हा पूल 50 वर्ष जुना असून, त्याची अवस्था पाहता त्याला दुरुस्तीची नाही तर त्याजागी नवीन पूल बांधण्याची गरज असल्याचे रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे. या पुलाचे सिमेंट निखळू लागले आहे. त्यामुळे मोठ्या अपघाताची भीती आहे. अर्धा पूल दुरुस्तीसाठी काढला आहे, याचवेळी वापरात असलेल्या पुलाच्या दुसर्‍या भागात अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? किंवा पूल दुरुस्तीनंतर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल रेल्वे प्रवासी संघटनांनी विचारला आहे.

एकूणच ठाण्यातील जुने आणि धोकादायक पूल यंदाच्या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहेत. सत्ताधारी विजयासाठी मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करत असतानाच, विरोधी पक्ष धोकादायक पुलांवरून मतदारांच्या संतापात भर घालणार आहेत, अशी स्थिती सध्या ठाण्यात निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -