सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील भुयारी मार्गात बत्ती गुल

The lights go out on the subway outside the CSMT railway station

सीएसएमटी रेल्वे स्थानक व मुंबई महापालिका मुख्यालय यांना जोडणारा भुयारी मार्ग (SubWay) तीन तास अंधारात बुडाला होता. याठिकाणी दुपारच्या सुमारास वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने बत्तीगुल झाल्याने काहीसा अंधार पसरला होता. मंत्रालय, सरकारी, खासगी कार्यालयातून कामावरून सुटून घरी निघालेल्या कर्मचाऱ्यांना अंधारमय स्थितीतून मार्ग काढत सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठावे लागले. (The lights go out on the subway outside the CSMT railway station)

मात्र सायंकाळी ६ नंतर खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. यामुळे भुयारी मार्गाचा वापर करणारे दुकानदार, पादचारी, सरकारी कर्मचारी यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सीएसएमटी रेल्वे स्थानक व मुंबई महापालिका मुख्यालय यांना जोडणाऱ्या भुयारी मार्गामध्ये साडेतीन वाजताच्या सुमारास दुकानांत नेहमीप्रमाणे कामकाज, पादचाऱ्यांची ये – जा सुरू असताना अचानकपणे निम्म्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे तेवढ्या भागात अंधार पसरला. तर एका बाजूच्या निम्म्या भागात वीज पुरवठा सुरू होता. त्यामुळे या मार्गामधील अनेक दुकानात अंधार पसरल्याने त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. तसेच, या भुयारी मार्गामधून ये – जा करणाऱ्या सरकारी, पालिका कर्मचारी, खासगी कार्यालयात, कंपनीत काम करणारे कर्मचारी, महिला मंडळी आदींना वीज पुरवठा खंडित झालेल्या भागांतून काहीसे चाचपडत चालावे लागले. त्यातच काही अप्रिय घटना घडून आपत्कालीन परिस्थिती ओढवली असती तर अंधारमय स्थितीत मदत कार्य करणेही अवघड झाले असते.

सुदैवाने तीन तासानंतर सबवे मधील वीज पुरवठा पूर्ववत झाला आणि दुकानदार, पादचारी, सरकारी कर्मचारी यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.