घरमुंबईभिवंडीत घराची भिंत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांची तब्बल तीन तासानंतर सुटका

भिवंडीत घराची भिंत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांची तब्बल तीन तासानंतर सुटका

Subscribe

गणपती विसर्जनाची सर्वत्र धामधूम सुरू असतानाच शहरातील अंजुरफाटा, शिवाजीनगर येथे एका बैठ्या घराची भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. या झालेल्या दुर्घटनेत घराशेजारील गल्लीत ड्रेनेज पाईपलाईनसाठी खोदकाम करणाऱ्या तीन मजुरांसह एक स्थानिक युवक जखमी झाला असून भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन मजूर अडकून पडले होते. या दोन मजुरांना अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने तब्बल तीन तासांनी जखमी अवस्थेत सुखरूप बाहेर काढले. त्यांच्यावर शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अंजुरफाटा, शिवाजीनगर येथील सार्वजनिक शौचालयानजीकची दुमजली इमारत व या दुर्घटनाग्रस्त घरामधील अरुंद गल्लीत इमारतीच्या शौचालयाच्या मलनि:सारण पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते त्यासाठी या अरुंद गल्लीत तीन मजूर खोदकाम करीत असताना या खोदकामामुळे नजीकच्या घराखालील पाया धसल्याने या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली खोदकाम करणारे विशाल, अनुष व विष्णुदेवा चव्हाण हे तीन मजूर अडकून पडले होते. तर त्यावेळी या ठिकाणाहून जाणारा स्थानिक युवक गणेश हा जखमी झाला आहे. यावेळी विष्णुदेवाने स्वतःची सोडवणूक करून घेतल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल व आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या दोन मजूरांची तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका करण्यात यश मिळविले.

- Advertisement -

कविता चंद्रमौळी एलगट्टी या विधवा महिलेचे हे घर असून ती आपल्या दोन लहान मुलींना घेऊन घराबाहेर बसली असल्याने ती सुदैवाने बचावली. मागील तीन दिवसांपासून खोदकाम सुरू असल्यामुळे भिंतीचा आवाज येत असल्याची तक्रार तिने इमारतीमधील व्यक्तींकडे केली होती. परंतू त्याकडे दुर्लक्ष केल्याने सदरची दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी महानगरपालिका मुख्यालय उपायुक्त डॉ. दीपक सावंत, सहाय्यक आयुक्त नूतन खाडे, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे आदींनी भेट देवून मदतकार्याची माहिती घेतली. जखमींवर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -